Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Wednesday, 12 August 2020

रिमझिम

रिमझिम
अंधारले नभ, ढग दाटलेले
तरंग उठले, मनोमनी..!

गारवा अंगात, पाऊस भिनला
हळूच शिरला, पानोपानी..!

नदी ओढे नाले, ओतप्रोत झाले
अवखळ चाले, प्रवाहाने..!

रानाच्या वाटेने, दरी नि कपारी
रंगते दुपारी, रिमझिम..!

वृक्ष लता वेली, हिरवे गालीचे
स्वप्न या मनीचे, बहरते..!

रान चिंबचिंब, माती मऊ ओल
अंकुरले खोल, कोंभ नवे ..!
• रघुनाथ सोनटक्के

Wednesday, 24 June 2020

बियाणं

बियाणं
निजलं मातीत
तान्हुलं बियाणं
बरसेन धोधो
उगावं जोमानं

काळ्या भू पडलं
पोटी गोड सपान
रान होईल हिरवं
पीकाच्या रूपानं

कुठे दोन पाती
ये ढेकुळ फोडून
विनवे विठोबाला
दोन हात जोडून

थोडासा शिरवा
जातो ढग पळून
एवढसं रोप ते
जाईन रे जळून

जगण्या धडपडे
गेलं भारानं वाकून
ओतलं मी सारं
ना हातचं राखून

भिजव रान सारं
नव्या तू दमानं
जीव सोडला काही
कोवळ्या कोंबानं
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

२५ जुन २०२० दै. आदर्श महाराष्ट्र 
२५ जुन २०२० दै. युतीचक्र 
३० जुन २०२० दै. जनमाध्यम

Thursday, 21 May 2020

बेवळा

बेवळा
रोज पायजे त्याले प्याले
खाले चकना दाणे काजू
मस्तवाल झाला साला
रायला हा बेवळा माजू

पिऊन पिऊन रोज
सळ्लं याचं लिवर
कदी पेते देसी कोरी
कदी गावरान पिवर

बायको पोरायले झोळ्ते
भांडे-कुंडे टाकते ईकून
मारामारी गाली गलोच
मारते हाती ईल ते फेकून

पेल्यावर मानत नाई कोनाले
बोलते इंग्लिस केवळा
सुनत नाई कोनाच्या बापाची
हाय हा इब्लिस बेवळा

सारं केलं वाटोय यानं
नुसतं पायजे याले खंबा
अस्या बेवळ्याचं काई खरं नाई
शेवटी होते मंग तो लंबा
• रघुनाथ सोनटक्के

 २१ मे २०२०, दै. युतीचक्र
Raghunath Sontakke

Friday, 8 May 2020

माही झोपळी

माही झोपळी
सुख नांदते घरात
नाई कायचीच कमी
वठी शब्द पेरमाचा
हाय आनंदाची हमी...

चुलीवर मी भाजतो
घामा भिजली भाकर
भुक पोटाची मिटते
येते तृप्तीचा ढेकर....

नेमी दुळ्ळीत रायते
भाजी भाकर कुटका
जाये ना उपासी कोनी
दारातून ह्या भटका...

भीती उभ्या ममतेच्या
देते सावली छप्पर
घारघुर रोज मले
झोप लागते अपार...

काम हाताले झटून
देते बापाचं वावर
पोरं बायको भक्कम
हावो जीता मी जोवर
• रघुनाथ सोनटक्के

 ९ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि दै. युतीचक्र
१० मे २०२०, दै. जनमाध्यम 


Monday, 20 April 2020

पाखरं

पाखरं
अंगणी येणारी सारी
झाली गायब पाखरं
चिऊ काऊ सर्वाशी
खेळती सान लेकरं

झाडांवर विणे पक्षी
काड्या-कापसाचा खोपा
चिवचिव पडे कानी
घेता झाडावर झोका

दारामधे धान्य वाळे
भुर्र टिपायचे किडा
सकाळ, संध्येला नभी
दिसत मोहक माळा

धान, बाज्रा पिकांवर
झुंडीने ती बसायची
त्यांच्यासह आपल्याला
काही कमी नसायची

चिऊ आणि काऊसंगं
बाळं गिळायची घास
झोपी जात अंगाईला
येई मायेचा हो वास
रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

१६ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र  
Raghunath Sontakke

१७ एप्रिल २०२०, जनमाध्यम 
२२ एप्रिल, युतीचक्र  
 
 

Wednesday, 15 April 2020

भीमराया

भीमराया
तोडून गुलामी | केलीस करणी
घेतली लेखणी | हाती भीमा..
तुझी प्रज्ञा मोठी | झुकली मस्तके
वाचली पुस्तके | अहोरात्र..
माणूसपणाची | दिली तू जाण
आणलेस भान | जागवून..
तळपता सूर्य | नवीन प्रभात
स्वप्न या डोळ्यात | रूजविले..
अज्ञान, अंधार | दूर जळमटे
दिसला पहाटे | ज्ञानसूर्या..
झाला तू कैवारी | कोटी उपकार
समता सागर | भीमराया..
दिले सम हक्क | स्त्री, दुबळ्यांस
लिहले देशास | संविधान

रघुनाथ सोनटक्के

 १५ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र
Vatratika, Raghunath Sontakke

Thursday, 29 August 2019

नाही विसरलो


• नाही विसरलो •
डोळ्यांनी अश्रू गाळणं सोडलं
बंद पापणीआड दु:ख आहे दडलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल घेलते ओठी तुझे नाव
मनी वसलेले फक्त तुझे गाव
हृदयावर नाव तुझं आहे गोंदलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल आणत जरी मोगर्‍याची फुलं
आठवतात तुझ्या कानातले ते डुलं
शांततेनं हृदयात वादळ आहे जपलं
अजून तुला नाही मी विसरलो

रात्रीला आठवतो बघून आकाशी
तुटतांना तारा तुला मागतो मनाशी
देवाला फक्त तेवढंच आहे मागलं
अजून तुला नाही मी विसरलो
• रघुनाथ सोनटक्के

दि. २९ ऑगस्ट २०१९ च्या दै. मराठवाडा संचारमधे प्रकाशित
३ सप्टेंबर २०१९ दै. स्वाभिमानी छावामधे प्रकाशित 

Thursday, 13 June 2019

पहिला पाऊस




पहिला पाऊस

जीव कासाविस
शुष्क सारी भुई
सगळ्यांची होई
लाहीलाही

दाटला अंधार
सुसाटला वारा
आसमंत
धरा
 गंधाळली

टप टप थेंब
सरीवर सरी
तृप्त सृष्टी सारी
प्राणीमात्र

गर्द झाडेवेली
नटली अवनी
पक्षी गातो गाणी
रानोमाळी

रम्य चराचर
दृश्य मनोहर
हर्ष सभोवार
दाटलेला

• रघुनाथ सोनटक्के ‎


११ जून २०१९ दै. औरंगाबाद केसरी मधे प्रकाशित
१८ जून २०१९ च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित
१५ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित
१९ जून २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
२७ जून २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
साप्ताहिक झी मराठी दिशा, २१ जून २०१९ ला प्रकाशित
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5624415757003576617&title=pahila%20paus&SectionId=4805737089856539540&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE 

 

Wednesday, 20 February 2019

तू

तू

कवी मी, कविता तू
विषय तू, आशय तू

प्रेरणा तू, कल्पना तू
उपमेय ना, उपमाच तू

सागर मी, सरिता तू
आकाश मी, धरा तू

पियानो मी, तार तू
ताल मी, सुर तू

नयन मी, स्वप्न तू
जीवन मी, आशा तू

• रघुनाथ सोनटक्के

१९ फेब्रुवारी २०१९ च्या साप्ताहिक 'सायबर क्राईम'ला प्रकाशित 
१६ मार्च २०१९ च्या तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित 
२७ डिसेंबर २०१८ च्या लोकमंथन मधे प्रकाशित

Tuesday, 1 January 2019

बायकोची आठोन

« बायकोची आठोन »

तु गेली सोळून मले
आता तुई आठोन ईवुन रायली
भाकरीचा झाला वांदा
तु माहेरी पोया खाऊन रायली

कोणी कितीबी मना बा
बायकोची सर ना ईवुन रायली
दुद चाललं ऊतू गॅसवर
अन् मॅगीबी जवुन रायली

कपळे धुवा मना तं
नुसतं बॅट ऊळून रायली
मले खायाले कुटके
अन् तु तिकळे भजे तळून रायली

जातांना मनली रागात
तुमाले लयच चळून रायली
दूर जावुन गळ्या मले
तु भारी घळून रायली

टिवी पावाव कितीखेप
मोबाईलची चार्जिंग उळून रायली
या सार्‍यामदे काय मजा
तिकळून नुसतं मले फटू धाळून रायली
• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905
  शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

२ जानेवारी २०१९ च्या दै. पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) मधे प्रकाशित
Raghunath Sontakke

Wednesday, 26 December 2018

पथीक

पथीक
 
फुले आहेत गोड म्हणून 
सहज त्यांना तोडू नकोस
पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस

खुशाल हसू दे जनास
दुःखावर आपल्या
कुणामुळे तू दुःख आपले
मनातल्या मनात गिळू नकोस

वेगळ्या वाटेचा तू पथीक
सहज कुणी अडवेल वाट तुझी 
संकटांचा साचेल ढीग पुढयात
तरी मनाने खचू नकोस

झालीच नाही कुणा मदत तुझी 
हात मागे कधी ओढू नकोस
पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस

चालत रहा पुढेच
नकोस करू लक्ष विचलीत
कुणी हिणवेल, कुणी रडवेल
भिक त्यांना घालू नकोस

होतील तुझ्याही चुका हजार
शल्य कधी मनात ठेऊ नकोस 
चुकल्यांना वाट दाखव
एकटं कुणा तू सोडू नकोस

पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस


 रघुनाथ सोनटक्के
दि. २६ मार्च २०१५


२७ डिसेंबर २०१८ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke



Friday, 14 December 2018

शेतकऱ्याची दैना

शेतकऱ्याची दैना

शेतकऱयांचे हाल सोडून भलतंच इथं गाजलं आहे
शेतकर्‍याचं पोर दुष्काळाने उपाशीच निजलं आहे

दुष्काळ जाहीर करून काय साध्य केलं जातं!
मलमपट्टी धोरणांमुळेच आत्महत्येस बाध्य केलं जातं

हमीभाव कधी मिळत नाही कुणी नसतो त्याचा वाली
फेकुन द्यावे लागते दूध, माल रस्त्यावर असाच दरसाली

'हमी' नाही त्याला कशाची फक्त आश्वासनापुरता 'भाव'
साथ नाही निसर्गाची सरकारही ढकलतंय धीमे नाव

पिकवुन त्याने शेतमाल किती घाम गाळला आहे
हमीभावाचा शब्द मात्र कुणी, कधी पाळला अाहे

उद्योगपतींना खुशाल आम्ही करतो कर्ज माफ
फक्त शेतकर्‍यानंच काय केलं एवढं मोठं पाप

कर्जमाफीच्या टाॅनिकने सुधारेल का आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्‍यासाठी येईल कधी बरा योग

घ्यावा लागतो शेतकर्‍याला अडकवुन गळ्यात फास
आत्महत्यांची आकडेवारी सांगताना लागत नाही ढास

शेतकर्‍याचा प्रश्न आता नाजूक अन् गंभीर आहे
प्रत्येकवेळी शासन म्हणते पाठीशी आम्ही खंबीर आहे

आश्वासन देऊन कुठे सातबारा त्याचा कोरा राहतो
उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारी फक्त नारा राहतो

वाली त्याचे असल्याचा प्रत्येकाचा तोरा असतो
घोषणाबाजीचाही हेतू नेहमीच कुठे खरा असतो

रघुनाथ सोनटक्के

१४ डिसेंबर २०१८ ला दै. नवाकाळमधे प्रकाशित 
Farmer

Monday, 1 October 2018

अवयवदान

« अवयवदान »

अवयवदान । करूया सारे
मरून उरा रे । जगती या ।।

पाप-पुण्याचा । कशा लेखाजोखा ।
दुर करा धोका । गरजुचा ।।

मरावे परी या । जगती उरावे
दान करावे । देह आपले ।।

रूढी-समजुतींना । देवुनी फाटे ।
दान करा मोठे । अवयवांचे ।।

अंधाला दृष्टी द्या । कुणाला हृदय
ब्रेनडेड होता । दान करा ।।

काळीज आपलं । देवून थोडं ।।
करा जीव गोड । आजार्‍याचा ।।

किडनी न् डोळे। आहेत दोन
वाचतील प्राण । एक देता ।।

त्वचा, आतडे । करा रक्तदान
वाचवा प्राण । वंचितांचे ।।
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. 8805791905

९ ऑक्टोबर २०१८ च्या सायबर क्राईम मध्ये प्रकाशित 


  

Monday, 3 September 2018

माझं प्रेम

« माझं प्रेम »

तुझ्यावर माझं किती प्रेम
विचार माझ्या मनाला
चंद्रतारे तर नाही देवु शकेन
पण प्राणही लावेन पणाला

मी खुप प्रेम करतो सखे 
अन् म्हणतेस त्यात काय वेगळं?
झाकून बघ माझ्या डोळ्यात 
सामावलं आहे त्यात सगळं 

मी तुझ्यावर किती प्रेम करतो 
देवू तुला कशाची ग्वाही 
पाहून घे डोळ्यात माझ्या 
चिरून बघ काळजालाही 

खोटंखोटं का होईना हळूच  
एकदा माझ्याकडे बघ 
भरलयं किती माझ्या डोळ्यात प्रेम 
कळेल तुला मग

डोकाऊन बघ जरासे मनात 
छेडून बघ मनाच्या तारा 
लिहून काढ प्रेमाच्या शाईने 
माझ्या मनाचा कागद कोरा 
रघुनाथ सोनटक्के 
तळेगाव दाभाडे, पुणे 
मो. ८८०५७९१९०५

६ सप्टेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
 ३० डिसेंबर २०१८ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित