Showing posts with label Rainy. Show all posts
Showing posts with label Rainy. Show all posts

Wednesday, 12 August 2020

रिमझिम

रिमझिम
अंधारले नभ, ढग दाटलेले
तरंग उठले, मनोमनी..!

गारवा अंगात, पाऊस भिनला
हळूच शिरला, पानोपानी..!

नदी ओढे नाले, ओतप्रोत झाले
अवखळ चाले, प्रवाहाने..!

रानाच्या वाटेने, दरी नि कपारी
रंगते दुपारी, रिमझिम..!

वृक्ष लता वेली, हिरवे गालीचे
स्वप्न या मनीचे, बहरते..!

रान चिंबचिंब, माती मऊ ओल
अंकुरले खोल, कोंभ नवे ..!
• रघुनाथ सोनटक्के

Sunday, 9 August 2020

झड

झड 

सावळे अंबर, हिरवी धरणी
सप्तरंगी धनू, अजब करणी

मेघ तो नादतो, सतार सरींचे
आलाप छेडीतो, पवन उरीचे

तृण इवलेसे, दवबिंदू कण
अलगद वाहे, डोळ्यातून मन

अंधार मुरतो, छेडीत तार
झोपडी झेलीते, गारांचा मार

दुधाळ निर्झर, वाहे खळखळ
नदीच्या भेटीस, अंतरी तळमळ

सुगंध मातीस, वीज तडतड
अंकुर फुलतो, झेलीत ही झड
रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

 

Raghunath Sontakke

Monday, 22 August 2016

पाऊस

पाऊस  - रघुनाथ सोनटक्के



काड्यांची छत्री
श्रावणाचा पाऊस
माझ्याविणा नको
गाणे 'ते' गाऊस

भिजलेला पदर
ओला ओला पाऊस
रूपासाठी नको
आणी काय लेवुस

खिडकीतुन डोकाव
रिमझिम पाऊस
माझ्याविणा नको
गरम चहा पिवुस

गार गार वारा
आणतोय पाऊस
चुलीमधे नको
माझं मन जावुस

तेच जुनं पुस्तक
परत तोच पाऊस
जुन्या त्या गुलाबाचा
गंध नको घेवुस
• रघुनाथ सोनटक्के


९ जून २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमध्ये प्रकाशित
२४ जून २०१८ च्या दै. तरुण भारत, अक्षरधारा पुरवणी मध्ये प्रकाशित 
९ सप्टेंबर २०१८ च्या दै. जनशक्ती (मुंबई) मधे प्रकाशित
http://epaper.ejanshakti.com/1808853/Mumbai-Janshakti/09-09-2018#page/8/1
१८ ऑगस्ट २०१९, दै. तरुण भारत, आसमंत पुरवणीत प्रकाशित
२२ ऑगस्ट २०१९, दै. एकमत साक्षी पुरवणीत प्रकाशित
१० सप्टेंबर  २०१९ दै. सकाळ, अकोला मधे प्रकाशित   
१ सप्टेंबर २०१९ दै. हिंदुस्थानमधे प्रकाशित





Thursday, 7 July 2016

आषाढाचे गित

आषाढाचे गित
                      
चातकाला लागे, कृष्णमेघाची अोढ
वाट पाहे वसुंधरा, येतो कधी आषाढ

नृत्य करी मयुर, बरसता जलधारा
प्रेयसी होय धुंद, झोंबता मंद वारा

गाऊ लागे मेघ मल्हार, साद देई विज
झोपडीत म्हणे माता, क्षणभर निज

घालती भक्तगण, विठ्ठलास साद
चंद्रभागेत मिसळे, टाळ मृदंगाचा नाद

प्रतिक्षा संपुन, न्हाऊ निघाली सृष्टी जणू
निरखुन पाहे देवेन्द्र, रूप त्याचे धणु

पाहण्या सारकाही, सुर्य ढगामागुन हसतो
हसु किती चैतन्यदायी, कृष्णमुरारी भासतो

झाली तृप्त धरणी, आनंदले सृष्टी चराचर
भुमिच्या कुशीतुन, डोकावे तृणांकुर

वसुंधरेने पांघरला, नवा हिरवा शालु
पक्षी-वृक्ष उल्हासुन, जणु लागले बोलु

नाचलो मी जलधारात, नाचली माझी प्रित
गावे सर्वांनी या, आषाढाचे गित


- रघुनाथ सोनटक्के -
तळेगाव, पुणे

 880 579 1905

( माझी प्रथम प्रकाशित कविता )


१९ जुलै २०१८ च्या दै. नवाकाळ मधे प्रकाशित 
२४ जुलै २०१८ च्या दै. युवा छत्रपती आणि २२ जुलै २०१८ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
दै. २२ जुलै २०१८ च्या दै. डहाणू मित्रमधे प्रकाशित


Tuesday, 12 April 2016

तुय लगन होईन तवा

तुय लगन होईन तवा

तुय लगन होईन तवा 
जाशीन तु दूर 
पण माह्या जीवात आग 
डोयात येईन पूर 

तुया लग्नात पोरी 
हासतीन तुये ओट
मले मातरं प्या लागीन 
तुया जुदाईचा घोट 

तुया हातावरची मेंदी 
रंगुन जाईन फार 
अन् लोकं उडवतील 
तुया लग्नाचा बार 

होईन तुयं शुबमंगल 
अन् पळीन गयात हार 
मी मातरं होईन
जागच्या जागी ठार 

लळशीन तु बेज्या 
सारं जग पाहीन 
कोणासाठी लळतं 
कोणाले नाई कईन 

मी तुयावर पेरम करो 
मले ध्यानात ठेवजो 
आठोन आली तवा 
चंद्राकळे पायजो 

या जन्मात नाही 
तुय माय मिलन 
पुढच्या जन्मी ना
तुया बिगर जमन 

● रघुनाथ सोनटक्के

१८ जानेवारी २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित
Raghunath Sontakke

Friday, 25 March 2016

मामाच्या पोरीची होई


मामाच्या पोरीची होई
(खास वर्हाडीबोलीभाषेतील कविता)
अशी राज्या मामाच्या पोरीची केली म्या होई
एवळी केली की रंगानं दिसे निरा काई

म्या म्हतलं घे हानुन आजचास तं रोज आहे
वर्सातुन एक संधी भेट्ते, होई काय रोज आहे

घरातबी नोतं कोनी म्या म्हतलं घ्या हानुन
म्या अन् तिनं मंग घेतली भांग पिऊन

दातबी केले काये, मंग तं भलकसी लळे
मी म्हणो चुडैल अन् ते म्हणे सोळ बाबू मले

म्या म्हतलं, 'तोंड कायं कर म्हणत होती मले
जाय बरं बाहीर लोकं काय म्हणतात तुले

मामा घरी ये लोग म्या रंगोलं तिले
मामा म्हणे पोरी कोनं हिंडोलं तुले

मंग तं खाये दातओठ अन् करे लाहीलाही
अजुनबी होईच्या दिशी करते नाई नाई

-रघुनाथ सोनटक्के
तळेगाव दाभाडे, पुणे

८८०५७९१९०५

(पुर्वप्रकाशित कविता, १९९९)

२७ मार्च २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित
Raghunath Sontakke