Showing posts with label Poems. Show all posts
Showing posts with label Poems. Show all posts

Wednesday, 12 August 2020

रिमझिम

रिमझिम
अंधारले नभ, ढग दाटलेले
तरंग उठले, मनोमनी..!

गारवा अंगात, पाऊस भिनला
हळूच शिरला, पानोपानी..!

नदी ओढे नाले, ओतप्रोत झाले
अवखळ चाले, प्रवाहाने..!

रानाच्या वाटेने, दरी नि कपारी
रंगते दुपारी, रिमझिम..!

वृक्ष लता वेली, हिरवे गालीचे
स्वप्न या मनीचे, बहरते..!

रान चिंबचिंब, माती मऊ ओल
अंकुरले खोल, कोंभ नवे ..!
• रघुनाथ सोनटक्के

Sunday, 9 August 2020

झड

झड 

सावळे अंबर, हिरवी धरणी
सप्तरंगी धनू, अजब करणी

मेघ तो नादतो, सतार सरींचे
आलाप छेडीतो, पवन उरीचे

तृण इवलेसे, दवबिंदू कण
अलगद वाहे, डोळ्यातून मन

अंधार मुरतो, छेडीत तार
झोपडी झेलीते, गारांचा मार

दुधाळ निर्झर, वाहे खळखळ
नदीच्या भेटीस, अंतरी तळमळ

सुगंध मातीस, वीज तडतड
अंकुर फुलतो, झेलीत ही झड
रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

 

Raghunath Sontakke

Thursday, 23 July 2020

श्रावण

श्रावण
रिमझिमतो श्रावण
घनदाट रानोमाळी
हिरवे होत चराचर
फुले सोनसकाळी

कुहूकुहू करे कोकिळ
नाचे मोर पिसार्‍यातून
हळूच डोकावे अनिल
ढगांच्या पसार्‍यातून

कधी कोवळी तिरीप
लख्ख दाह तो नभी
इंद्रधनू सप्तरंगासवे
खुलवत राहे कधी

वाहे अवखळ वारा
बिलगतो प्रिया परी
तारूण्य असे बहरले
सुरूच हलक्या सरी

निसर्ग तो धरणीला
वेढून घेत मनोहारी
सुंदर मनमोहक भासे
धरा ही राधा बावरी
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
२६ जुलै २०२०, दै. युतीचक्र 
३० जुलै २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र