शेतकऱ्याची दैना
शेतकऱयांचे हाल सोडून भलतंच इथं गाजलं आहे
शेतकर्याचं पोर दुष्काळाने उपाशीच निजलं आहे
दुष्काळ जाहीर करून काय साध्य केलं जातं!
मलमपट्टी धोरणांमुळेच आत्महत्येस बाध्य केलं जातं
हमीभाव कधी मिळत नाही कुणी नसतो त्याचा वाली
फेकुन द्यावे लागते दूध, माल रस्त्यावर असाच दरसाली
'हमी' नाही त्याला कशाची फक्त आश्वासनापुरता 'भाव'
साथ नाही निसर्गाची सरकारही ढकलतंय धीमे नाव
पिकवुन त्याने शेतमाल किती घाम गाळला आहे
हमीभावाचा शब्द मात्र कुणी, कधी पाळला अाहे
उद्योगपतींना खुशाल आम्ही करतो कर्ज माफ
फक्त शेतकर्यानंच काय केलं एवढं मोठं पाप
कर्जमाफीच्या टाॅनिकने सुधारेल का आत्महत्येचा रोग
हवालदील शेतकर्यासाठी येईल कधी बरा योग
घ्यावा लागतो शेतकर्याला अडकवुन गळ्यात फास
आत्महत्यांची आकडेवारी सांगताना लागत नाही ढास
शेतकर्याचा प्रश्न आता नाजूक अन् गंभीर आहे
प्रत्येकवेळी शासन म्हणते पाठीशी आम्ही खंबीर आहे
आश्वासन देऊन कुठे सातबारा त्याचा कोरा राहतो
उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारी फक्त नारा राहतो
वाली त्याचे असल्याचा प्रत्येकाचा तोरा असतो
घोषणाबाजीचाही हेतू नेहमीच कुठे खरा असतो
रघुनाथ सोनटक्के
No comments:
Post a Comment