Showing posts with label Poem. Show all posts
Showing posts with label Poem. Show all posts

Sunday, 9 August 2020

झड

झड 

सावळे अंबर, हिरवी धरणी
सप्तरंगी धनू, अजब करणी

मेघ तो नादतो, सतार सरींचे
आलाप छेडीतो, पवन उरीचे

तृण इवलेसे, दवबिंदू कण
अलगद वाहे, डोळ्यातून मन

अंधार मुरतो, छेडीत तार
झोपडी झेलीते, गारांचा मार

दुधाळ निर्झर, वाहे खळखळ
नदीच्या भेटीस, अंतरी तळमळ

सुगंध मातीस, वीज तडतड
अंकुर फुलतो, झेलीत ही झड
रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

 

Raghunath Sontakke

Wednesday, 24 June 2020

बियाणं

बियाणं
निजलं मातीत
तान्हुलं बियाणं
बरसेन धोधो
उगावं जोमानं

काळ्या भू पडलं
पोटी गोड सपान
रान होईल हिरवं
पीकाच्या रूपानं

कुठे दोन पाती
ये ढेकुळ फोडून
विनवे विठोबाला
दोन हात जोडून

थोडासा शिरवा
जातो ढग पळून
एवढसं रोप ते
जाईन रे जळून

जगण्या धडपडे
गेलं भारानं वाकून
ओतलं मी सारं
ना हातचं राखून

भिजव रान सारं
नव्या तू दमानं
जीव सोडला काही
कोवळ्या कोंबानं
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

२५ जुन २०२० दै. आदर्श महाराष्ट्र 
२५ जुन २०२० दै. युतीचक्र 
३० जुन २०२० दै. जनमाध्यम