Showing posts with label Calligraphy by Raghunath Sontakke. Show all posts
Showing posts with label Calligraphy by Raghunath Sontakke. Show all posts

Monday, 20 September 2021

क्षणिक

क्षणिक 
अहंकार भरे / नश्वर देहात 
अंती दोन्ही हात / रिकामे रे 

सुखाचा पिसारा / दावीतो जगाला 
कुठे मिळे तुला / समाधान? 

नाही भरवसा / जीवन क्षणिक 
धन ते आणिक / माया सारे 

श्वासही पुरेना / पै पै मोजता 
दिवा तो विझता / अंधःकार 

दुखविता जन / काळजात सल 
अंती मिठे बोल / उरतील
 • रघुनाथ सोनटक्के 
   तळेगाव दाभाडे, पुणे 
   मो. ८८०५७९१९०५

Raghunath Sontakke





Friday, 8 May 2020

माही झोपळी

माही झोपळी
सुख नांदते घरात
नाई कायचीच कमी
वठी शब्द पेरमाचा
हाय आनंदाची हमी...

चुलीवर मी भाजतो
घामा भिजली भाकर
भुक पोटाची मिटते
येते तृप्तीचा ढेकर....

नेमी दुळ्ळीत रायते
भाजी भाकर कुटका
जाये ना उपासी कोनी
दारातून ह्या भटका...

भीती उभ्या ममतेच्या
देते सावली छप्पर
घारघुर रोज मले
झोप लागते अपार...

काम हाताले झटून
देते बापाचं वावर
पोरं बायको भक्कम
हावो जीता मी जोवर
• रघुनाथ सोनटक्के

 ९ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि दै. युतीचक्र
१० मे २०२०, दै. जनमाध्यम 


Saturday, 25 August 2018

भाऊराया



« भाऊराया »


Calligraphy by Raghunath Sontakke


माझ्या भावाचा ना महल
आहे छोटसं मायाळू घर
सुखाचा संसार त्याचा
नाही त्याला कशाची सर

भाऊबीजेला येतो घरी
वाट पाहते टक लावूनी
साठविते रूप त्याचं
माझ्या या गं लोचनी

राखी बांधाया हात त्याचा
मिळू दे मला जन्मोजन्मी 
पहाडासारखा उभा पाठी
मला नाही कशाची गं कमी

रक्षण करील तो माझं
नाही त्याला कशाची पर्वा
आयुष्य लाभु दे उदंड 
माझा जीव आहे त्यात सर्वा

आम्हा दोघामधे आहे
राखीचा हा प्रितीबंध
नातं राहू दे देवा आमचं
जन्मोजन्मी एकसंध


•  रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

६ नोव्हेंबर २०१८ देशोन्नती नागपूर दिवाळी विशेषांकात प्रकाशित 
दै. कार्यारंभ (बीड) मधे २३ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
साप्ताहिक सायबर क्राईम मधे २७ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 


  


Wednesday, 11 July 2018

उघाड

« उघाड »


Calligraphy by Raghunath Sontakke

अशी देली रं उघाड
पिकांनी टाकली मान
हुलकावणी दिली गड्या
कंठाशी आलाय प्राण

होतं नोतं टाकलं मातीत
जीव ओतला सारा
कष्टाचं होऊ दे सोनं
रानी गुंजतो फकस्त वारा

पिढी खपली रानात
दान पडू दे रं पदरी
पोटाला अन ल्याला काप्डं
मुक्याला मिळंल बाजरी

वार्‍यासंग ढगबी पळती
रातीला पडतं चांदणं
फाटक्या झोळीला भरू दे
हाय एवढंच आम्चं मागणं

उन्हातान्हांत खपुन झालं
अन् तुजं अस्मानी वागणं
भुईसंग आसावला जीव
अन् मेघा तुजी वाट बघणं!

अन् मेघा तुजी वाट बघणं!


• रघुनाथ सोनटक्के

   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

१९ ऑगस्ट २०१८ च्या दै. लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित
२२ जुलै २०१८ च्या दै. तरुण भारत मधे प्रकाशित 
१२ जुलै २०१८ दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
 १५ जुलै २०१८ च्या दै. विदभ मतदार मधे प्रकाशित
१५ जुलै २०१८ सा. कल्याण टाईम्स मधे प्रकाशित

                                Vidarbha Matadar - Raghunath Sontakke
Kalyan Times - Raghunath Sontakke