Monday 2 December 2019

परतीचं पानी

परतीचं पानी
गेला श्रावण कोरडा
पीक सारं होतं सुकलं
दुबारनी आलेलं हाताशी
तेही आता आहे हुकलं

भीजलं सारं सोयाबीन
ज्वारी झाली काळीभोर
रबी गेला घेऊन पीक
खरिपाची तोडली डोर

कोसळला भरीव धान
कणसाला फुटले कोंब
उराशी बाळगलेल्या सार्‍या
सपनाचा झाला होम

वावरात साचलं पाणी
पीक पिवळसर पडलं
भरल्या माठाला गड्या
एका रातीतच तोडलं

कपाशीचा गळला फुलोर
सडल्या आतून बोंड्या
काळा पडला कापूस
जशा बकरीच्या लेंड्या

आधी देली हुलकावणी 
आता ज्यादाचं पडलं
वाकलेलं माझं कंबरडं
अजुनच आहे मोडलं  
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
साप्ताहिक कृषकोनती २० ऑक्टोबर २०२०
Raghunath Sontakke



परतीचं पानी
(वर्‍हाडी)

गेला सरावन कोळ्लां
अगाईत त्वा चिमोलं
दुबारनी आलं हातासी
तेई आता लांबोलं

सळ्ळं सारं सोयाबीन
जवारी झाली काईभोर
रब्बी गेला घेऊन
खरिपाची तोळ्ली डोर

मोळ्ळे लंबे धांडे
कनसाले फुटले कोंम
देल्ला फिरून पोतेरा
सपनाचा झाला होम

भरल्या वावरात डाबरी
पीक पिव्वं धम पळ्लं
भरल्या माठाले गळ्या
एका रातीतच तोळ्लं

पराटीचे गयले फुलं
सळ्ळ्या अंदरून बोंड्या
काया पळ्ळां कापुस
जश्या बकरीच्या लेंड्या

आदी देल्ती चाट
आता ज्यादाचं पाळ्लं
वाकेल मायं कंबळ्लं
आजुनच हाय मोळ्लं
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे

३ नोव्हेंबर २०१९ च्या दै. विदर्भ मतदार आणि दै लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित 





No comments:

Post a Comment