सीतादई
बहरलं हिर्व रान
आली पर्हाटी फुलून
दह्यावानी पांड्डापट
निंगे कापुस ऊलून
टोचे बोटाले कच्कन
त्याची धारदार नखं
बाई खंदाळी येचता
गेले दुखून वं बखं
तपे सुर्य अभायात
झाल्या बोंडाच्या चांदन्या
संध्याकाई ईन बंडी
भरले गठोळे बांधन्या
वाजे कसांड्या पांदीनं
आला घ्याले घरधनी
भरल्या खंदाळ्या पाऊन
जीव गेला हरकुनी
हात लावा वं सयाव्हा
घेते पान्याचं भरनं
बरबटी शेंगा-भेंडं
जमा केले त्यात वरनं
चार गाठोळे बसले
ऐकमेकाले खेटून
गादी कर्याले जरासा
औंदा ठेवतो राखून
किस्न निजे पायन्यात
ऊतू गेलं लाह्या-दही
देवा! पिकू दे असंच
आता झाली सीतादई
• रघुनाथ सोनटक्के
No comments:
Post a Comment