Friday, 8 May 2020

माही झोपळी

माही झोपळी
सुख नांदते घरात
नाई कायचीच कमी
वठी शब्द पेरमाचा
हाय आनंदाची हमी...

चुलीवर मी भाजतो
घामा भिजली भाकर
भुक पोटाची मिटते
येते तृप्तीचा ढेकर....

नेमी दुळ्ळीत रायते
भाजी भाकर कुटका
जाये ना उपासी कोनी
दारातून ह्या भटका...

भीती उभ्या ममतेच्या
देते सावली छप्पर
घारघुर रोज मले
झोप लागते अपार...

काम हाताले झटून
देते बापाचं वावर
पोरं बायको भक्कम
हावो जीता मी जोवर
• रघुनाथ सोनटक्के

 ९ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि दै. युतीचक्र
१० मे २०२०, दै. जनमाध्यम 


Saturday, 25 April 2020

पुस्तके

पुस्तके
ज्ञान प्रकाशाने | उजळते डोके
वाचून पुस्तके | नियमित

ज्ञानोबा, तुकोबा | अगाध भांडार
लिहून ते सार | ठेवियले

ग्रंथ हेच गुरू | मानियले ज्यांनी
लिहिलेय त्यांनी | संविधान

दाखविती मार्ग | जणू ते माऊली
पावलोपावली | जग
ताना

अध्यात्म, विज्ञान | पुस्तके भांडार
आणि व्यवहार | शिकवती

पानापानांतून | ज्ञान त्यांच्या झरे
डोक्यात उतरे | वाचकाच्या

पुस्तकेच गुरू | मित्रासम गुण
शब्दा-शब्दांतून | बोलतात

अनमोल ठेवा | ज्ञानाचा हा मेवा
नव्या या पिढीस | चाखवावा
• रघुनाथ सोनटक्के


 २६ एप्रिल २०२०, दै. युतीचक्र,  २७ एप्रिल २०२०, दै. जनमाध्यम, 
मे २०२०, दै. आदर्श  महाराष्ट्र

Raghunath Sontakke
Raghunath Sontakke

Monday, 20 April 2020

पाखरं

पाखरं
अंगणी येणारी सारी
झाली गायब पाखरं
चिऊ काऊ सर्वाशी
खेळती सान लेकरं

झाडांवर विणे पक्षी
काड्या-कापसाचा खोपा
चिवचिव पडे कानी
घेता झाडावर झोका

दारामधे धान्य वाळे
भुर्र टिपायचे किडा
सकाळ, संध्येला नभी
दिसत मोहक माळा

धान, बाज्रा पिकांवर
झुंडीने ती बसायची
त्यांच्यासह आपल्याला
काही कमी नसायची

चिऊ आणि काऊसंगं
बाळं गिळायची घास
झोपी जात अंगाईला
येई मायेचा हो वास
रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

१६ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र  
Raghunath Sontakke

१७ एप्रिल २०२०, जनमाध्यम 
२२ एप्रिल, युतीचक्र  
 
 

Wednesday, 15 April 2020

भीमराया

भीमराया
तोडून गुलामी | केलीस करणी
घेतली लेखणी | हाती भीमा..
तुझी प्रज्ञा मोठी | झुकली मस्तके
वाचली पुस्तके | अहोरात्र..
माणूसपणाची | दिली तू जाण
आणलेस भान | जागवून..
तळपता सूर्य | नवीन प्रभात
स्वप्न या डोळ्यात | रूजविले..
अज्ञान, अंधार | दूर जळमटे
दिसला पहाटे | ज्ञानसूर्या..
झाला तू कैवारी | कोटी उपकार
समता सागर | भीमराया..
दिले सम हक्क | स्त्री, दुबळ्यांस
लिहले देशास | संविधान

रघुनाथ सोनटक्के

 १५ एप्रिल २०२०, आदर्श महाराष्ट्र
Vatratika, Raghunath Sontakke

Monday, 9 March 2020

धुयमाती

धुयमाती
धुयमातीच्या दिसी
पक्या लय व्हता पेला
रंंग हाताले लावुन थो
घरी दोस्तायच्या गेला

घेत्ली त्यांनं देसीची
दोस्तायसंग क्वाैटर
नेम त्याचा दिसेच मले
हा घळोते भलतं मॅटर

दोस्तमीत्र त्याले भलकसे
चळोतं हरभर्‍याच्या झाळावर
हा तं मंग समजे जसा
चळ्लो आपुन गळावर

दोस्तायनं त्याच्या मंग
गटारात त्याले घातला
ज्यादा झाली दारू तं
मंग भदाभदा वक्ला

वैनी-वैनी करत थो
शालीच्या घरी मंग पोच्ला
रंगानं भीजोयाले तिले
पक्या रंदावनातच बस्ला

सोळा म्हणे मले तुमी
शाली बोलून भल्ली थक्ली
जानकुळ काळून चुलीतलं
मांग भलकसी लागली

घरात आपल्या घुसत
पक्या बायकोमांग लपला
माहित पळ्ळ्यावर मामला
बायकोनई बम चोप्ला

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

२६ मे २०२०,  आदर्श महाराष्ट्र
Raghunath Sontakke


 

Friday, 6 March 2020

पक्याचा वैलेंनटाईन

 वर्‍हाडी कविता

पक्याचा वैलेंनटाईन

(वर्‍हाडी कविता)
 
वैलेंनटाईनच्या दिसी
पक्या उट्ला पायटी
आंग धून रेडी झाला
कदी नाई तो नवती

सेंट मारला बगलीत
बुटाले केली मालिस
खटारा गाळी बनोली
जसी नवी काॅलीस

पक्या चाल्ला व्हता
हातात गुलाब घिवुन
येतो म्हणे कालेजात
एका पोरीले त्या दिवुन

रस्त्यात भेट्ली चंदाबुडी
आळोला तिनं रस्ता
पळनार व्हता त्याले म्हाग
लाल गुलाब सस्ता

पक्या नेमीच घेत जाये
निरानाम बुडीचे खेटे
चंडायन्या केल्यावर मंग
बुडी भल्ककसीच पेटे

संदी पावुन चांगली
बुडीनं रस्ता अळोला
दे मले फुल मनत
अवाज तीनं वाळोला

हातातला गुलाब नाता
दे रे माह्या देवाले
नाई तं दिन सांगुन
तुया बाप रामभावाले

बुडीच्या ब्लैकमेलमदी
पक्या भल्ता फसला
परपोज गेलं खड्डयात
अन् वैलेंटाईन कस्ला

• रघुनाथ सोनटक्के ©
   (प्रकाशित)

आवडल्यास नावासह शेअर करा.
१९ मे २०२०, दै. युतीचक्र  
Raghunath Sontakke

Tuesday, 3 March 2020

विरह

विरह
किती गं सांभाळू
तुझ्या आठवणी
स्वप्नाळू या मनी
साठविल्या

पेटला विरह
तुडूंब ही आस
विरह नी भास
करे दाह

अतिव ती याद
कोपर्‍यात मनी
घालतो नयनी
साद तुला

शिशिरच ऋतू
मनी पेटलेला
जीव आसावला
हवीच तू

धरेसम मन
जणू फाटलेले
पंख छाटलेले
अंकुरावे

• रघुनाथ सोनटक्के


१ मार्च २०२० च्या लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित.
२४ एप्रिल २०२०, दै . युतीचक्र  
 २५ एप्रिल २०२०, दै. जनमाध्यम
Vatratika, Raghunath Sontakke
Raghunath Sontakke
Raghunath Sontakke