Sunday 26 July 2020

आलाय श्रावण

आलाय श्रावण
आलाय श्रावण
बरसल्या धारा
चिंबचिंब झाला
भवताल सारा

आलाय श्रावण
हिरवी धरती
फुलुनिया वल्ली
अवतीभवती

आलाय श्रावण
पीक रानी डोले
राबत्या हातांचे
स्वप्न गोड झाले

आलाय श्रावण
रेलचेल चाले
सयांसंगे झिम्मा
गोपाळही खेळे

आलाय श्रावण
सखी ओलीचिंब
नयनात तिच्या
मिलनाचे बिंब
• रघुनाथ सोनटक्के
२८ जुलै २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र 
Raghunath Sontakke
 

Thursday 23 July 2020

श्रावण

श्रावण
रिमझिमतो श्रावण
घनदाट रानोमाळी
हिरवे होत चराचर
फुले सोनसकाळी

कुहूकुहू करे कोकिळ
नाचे मोर पिसार्‍यातून
हळूच डोकावे अनिल
ढगांच्या पसार्‍यातून

कधी कोवळी तिरीप
लख्ख दाह तो नभी
इंद्रधनू सप्तरंगासवे
खुलवत राहे कधी

वाहे अवखळ वारा
बिलगतो प्रिया परी
तारूण्य असे बहरले
सुरूच हलक्या सरी

निसर्ग तो धरणीला
वेढून घेत मनोहारी
सुंदर मनमोहक भासे
धरा ही राधा बावरी
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
२६ जुलै २०२०, दै. युतीचक्र 
३० जुलै २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र 
 

Friday 17 July 2020

पावसाची वाट

पावसाची वाट
पेरून झालं गड्या वावर
रोप आलेत थोडे वरं
ढगांशिवाय आभाळ खुलं
जोमानं तू बरस बरं

डोळे लागले आभाळाकडं
आहे पीक जळायचा धोका
अंगावर येतो काटा माझ्या
नको दुबार पेरणीचा मोका

दमदार बरसायला हवं
उगवतीन मग सारे तासं
असंच कोरडं राहीलं तर
होईन देवा माझं कसं ?

धाकधुक आहे मनाला
बरस बा पावसा जोमानं
जीव लागला टांगणीला
मान झुकवली रं कोंबानं

नको पाहुस अशी परीक्षा
करू नकोस राजा हाल
काबाडकष्ट करून उन्हात
फिरवला आहे मी फाळ
रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
 १८ जुलै २०२० दै युतीचक्र 
Raghunath Sontakke
 

पावसाची प्रतिक्षा

पावसाची प्रतिक्षा
कुठं पडतो तू भरपूर
कुठं नावापुरताच पडला
याहीवर्षी
आम्हावर 
अन्यायच घडला

शिडकावा पडला होता
रोप आता करपली आहेत
तुझ्या येण्याची वाट पाहत
लेकरं तुझी तरसली आहेत

माना टाकल्यात पिकांनी
पानं आता आवरली आहेत
आत्महत्येच्या विचाराने आता कुठं
पोरं तुझी सावरली
हेत

थोडे ढग फिरकतात
अन् लख्खं ऊन पडते
उसनवारीत पेरललं पिक
जगायला तडफडते

बरस बा एकदाचा
नदी नाले तुडूंब वाहू दे
पिकू दे मोत्यावाणी धान
अन् जग सुखी राहू दे
• रघुनाथ सोनटक्के

चिंब आठव

चिंब आठव
चमकून वीज
रुतली घनात
काहूर मनात
माजलंया..!

गारवा झोंबून
काळ्या रातीला
प्रेमाच्या वातीला
चेतवितो..!

बरसता सरी
चिंब चिंब रात
तुझं प्रेमगीत
येई ओठी..!

दाट आठवणी
आल्यात भरून
टिपं ती धरून
डोळ्यांखाली..!

आठवतो तुझा
क्षुब्ध गहिवर
झाला अनावर
मज किती..!

आहे मी जपलं
दोघांचं गुपीत
मनाच्या कुपीत
दरवळे..!
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
  १८ जुलै २०२० युवा छत्रपती 
१९ जुलै २०२०, दै. विदर्भ मतदार
२० जुलै २०२०, दै.जनमाध्यम
२३ जुलै २०२०, आदर्श महाराष्ट्र
 २६ जुलै २०२०, लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणी 
 साप्ता. लोकसंकेत ६ ऑगस्ट २०२०
 दै.  नवाकाळ १६ ऑगस्ट २०२०

Vatratika, Raghunath SontakkeRaghunath Sontakke'

Raghunath Sontakke


Saturday 11 July 2020

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा
चातकासम वाट
पाहे बळीराजा
बरसतो मृग तो
करे गाजावाजा

सुटे थंड गारवा
पडे रिमझिम सर
पक्षी लगबगीने
गाठती मग घर

झाडे-फांद्या, वेली
न्हाऊ लागे धरा
घाले गुंफण देही
वेल्हाळ तो वारा

लागे कामास बळी
पेरत बीज पोटी
प्रसवे काळी भुई
अंकुरत मोती

पाऊले पंढरी
पताका नभी डुले
श्रावण सरीसवे
मन होई ओले

वाहे नदी ओसंडून
शुभ्र वाहती झरे
इंद्रधनू दाखवे
सप्तरंग खरे

आषाढ, श्रावण
चैतन्य नवे, गारवा
आवडे जीवास
ऋतू हा हिरवा !
• रघुनाथ सोनटक्के
  पुणे, मो. ८८०५७९१९०५

 १२ जुलै २०२०, दै. युतीचक्र 
१३ जुलै  दै. आदर्श महाराष्ट्र

Monday 6 July 2020

पांडुरंगा

पांडुरंगा

विठू सावळा तू / कर कटेवरी
सोड आता तरी / ध्यान तुझे

तुझ्या या मळ्यात / पिकवितो धान  
नाही थोडा मान  / का विठ्ठला?

काळ्या मातीचाच / लावीतो मी बुक्का
राबतोय सखा / नंदीदेव

रखूमाई सखी / संसारात गोडी
सुख-दु:खा जोडी / नांदताहे

झुलती पताका / उभ्या पिकांवरी
जमले भूवरी / वारकरी

युगे अठ्ठावीस / सोसतो दारिद्र्य
स्वत: मी अभद्र / समजतो
दुष्काळाने असा / गाठला कळस
कष्टाची ही तुळस / डोई माझ्या

शेतामधे माझ्या / करितो मी वारी
हर दु:खे सारी / पांडुरंगा
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
Raghunath Sontakke

Sunday 5 July 2020

विठ्ठला

विठ्ठला

बुडते हे जग / वाचव रे देवा
ऐक माझा धावा / बा विठ्ठला

दु:ख, पीडा, रोग / वाढत का जावे
किती रे पाहावे / बा विठ्ठला

तुझ्या या मळ्यात / पिकवे जो धान  
नाही त्यास मान  / का विठ्ठला?

निर्बल सोसतो / यातना कठीण
भर त्यात प्राण / बा विठ्ठला

जात, धर्म, पंथ / दुग्ध अभिषेक
उपाशी तो एक / का विठ्ठला?

मातले ते ढोंगी / मिथ्या देशभक्ती
मिळे केव्हा मुक्ती / ती विठ्ठला

भ्रष्ट जातीधर्म / स्वार्थी किडे, भुंगे
पाहतो का दंगे / हे विठ्ठला
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

२ जुलै २०२० दै. युतीचक्र