Saturday 30 May 2020

काहून नाई पेले देशी

काहून नाई पेले देशी
बाबा तुमी काहून घेतली फाशी
काहून नाई पेले तुमी दारू देशी
तुमी गेले त्या दिशी कोणी नाय पाह्यलं
दारू पेणार्याच्या घराले टिवीवर दाखोलं
तुमी आणली ही टिवी अशीकशी
बाबा काहून नाई पेले तुमी दारू देशी
सारं कसं उलटं हून राह्यलं
ढोसणार्याले अनुदान भेटून राह्यलं
पोशींदा मरून राह्यला उपाशी
बाबा काहून नाई पेले तुमी दारू देशी
नोकरवरगाले सरकार आयोग देवून राह्यलं
बिल नाही म्हून आमाले अंधारात ठुन राह्यलं
आमचं म्हणणार्या सरकारची निती हाय कशी
बाबा काहून नाई पेले तुमी दारू देशी
 • रघुनाथ सोनटक्के

Friday 22 May 2020

प्रभात

प्रभात
सूर्य लालेलाल
नभी गोल टिळा
चमकती प्रभा
वाढे तोळा तोळा

शेतामधे हिरवे
पीक लांब तुरे
पहाडी लोंबती
दुधी फेस झरे

मखमली तृण
गाई-गुरं चरे
खळखळ नदी,
झुळझुळ वारे

झाडावर गाणे
कोकीळ ती कुहे
खोप्यातून पिल्लू 
उंच नभी पाहे

चकाकते दंव
रानफुल ओले
मकरंद चाखत
भ्रमर तो डोले
• रघुनाथ सोनटक्के

 २२ मे २०२०, दै आदर्श महाराष्ट्र,
२६ मे २०२०, दै युतीचक्र
२७ मे २०२०, दै. जनमाध्यम 
३१ मे २०२०, दै. लोकशाही वार्ता  
 ७ जून २०२०, दै. विदर्भ मतदार
१२ जुलै २०२०, दै. तरुण भारत, नागपूर (आसमंत पुरवणी)
Raghunath Sontakke

Thursday 21 May 2020

बेवळा

बेवळा
रोज पायजे त्याले प्याले
खाले चकना दाणे काजू
मस्तवाल झाला साला
रायला हा बेवळा माजू

पिऊन पिऊन रोज
सळ्लं याचं लिवर
कदी पेते देसी कोरी
कदी गावरान पिवर

बायको पोरायले झोळ्ते
भांडे-कुंडे टाकते ईकून
मारामारी गाली गलोच
मारते हाती ईल ते फेकून

पेल्यावर मानत नाई कोनाले
बोलते इंग्लिस केवळा
सुनत नाई कोनाच्या बापाची
हाय हा इब्लिस बेवळा

सारं केलं वाटोय यानं
नुसतं पायजे याले खंबा
अस्या बेवळ्याचं काई खरं नाई
शेवटी होते मंग तो लंबा
• रघुनाथ सोनटक्के

 २१ मे २०२०, दै. युतीचक्र
Raghunath Sontakke

Tuesday 12 May 2020

माय

माय
लेकराले देते पुरन पोई
सोता कयन्याची भाकर
नेमी वायते नदीसारखी
अन् व्हते मायेचा सागर

फाटकं नेमी तिचं लुगळं
शिवते संसार फाटका
पायना टांगुन सावलीत
सह्यते उनाचा चटका

आसू ठूते लपून डोयात
अस्ते कायजी लय वधर
लेकानं जरी दुखोलं तीले
तरी पसरते त्याले पदर

झीजून जन्म चंदनासारका
शेवटालोग खपत रायते
लेकरासाठी तिचा जीव
तयतय निस्ता तुटत रायते
• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५
Raghunath SontakkeRaghunath Sontakke  १३ मे २०२०, दै. युतीचक्र आणि दै. जनमाध्यम

११ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र 
Raghunath Sontakke

आई माझी

आई माझी
क्षमेचे आगर
दयेचा सागर
मायेची घागर
आई माझी

धन, हिरे-मोती
वाहतो अपार

दीन तो कुबेर
तिच्यापुढे

डोळ्यात दिसते
अगाध ती माया
पदराची छाया
वृक्षापरी!!

शिवला संसार
नेटका करून
कष्टाने भरून
फुलविला

आयुष्याचे शिल्प
शिक्षणाचा वाडा
संस्काराचा घडा
सजविला

झिजली आयुष्य
होऊन चंदन
करतो वंदन
आई माझी
• रघुनाथ सोनटक्के

१२ मे २०२०, दै. युतीचक्र  
Raghunath Sontakke

Friday 8 May 2020

माही झोपळी

माही झोपळी
सुख नांदते घरात
नाई कायचीच कमी
वठी शब्द पेरमाचा
हाय आनंदाची हमी...

चुलीवर मी भाजतो
घामा भिजली भाकर
भुक पोटाची मिटते
येते तृप्तीचा ढेकर....

नेमी दुळ्ळीत रायते
भाजी भाकर कुटका
जाये ना उपासी कोनी
दारातून ह्या भटका...

भीती उभ्या ममतेच्या
देते सावली छप्पर
घारघुर रोज मले
झोप लागते अपार...

काम हाताले झटून
देते बापाचं वावर
पोरं बायको भक्कम
हावो जीता मी जोवर
• रघुनाथ सोनटक्के

 ९ मे २०२०, दै. आदर्श महाराष्ट्र आणि दै. युतीचक्र
१० मे २०२०, दै. जनमाध्यम