Monday, 25 March 2019

मामाची पोर

मामाची पोर
माझ्या मामाची शाली भलकसी लाजते
दिसलो कि मी तिले खुदूखुदू हसते

गेलो मी बाहेर कि टेप लावून नाचते
संध्याकाळी माझ्यादेखत शिंगार करून सजते

नसलं घरी कुणी तवा जवळ येऊन बसते
पिक्चरात जशी हिरोमांग हिरोईन असते

लग्नाची निगाली गोठ कि खुदूखुदू हसते
घडीघडी करत इशारे, जवा घरी कुणी नसते

दिवसातून दोन वेळा गोल साठी नेसते
हिडगावते अशी कि स्वत:ले हिरोईन समजते

अशा शालीसारखी कुठे मामाची पोर असते
मनात काय चालू आहे नेहमी मले पुसते

अशी मामाची पोर नखरे करत असते
आपून पाह्यलं साधंसुधे आपल्याच गळ्यात बांधून भेटते
• रघुनाथ सोनटक्के

प्रकाशित कविता

Sunday, 24 March 2019

आठवण

« आठवण »

मनाच्या खोलीत
हृदयाच्या कप्प्यात
प्रेमाच्या शाईत
कवितेच्या वहीत
एकतरी पान तुझं लिहिलं
खरंच तुझी आठवण येईल

ढग येतील भरून
वारा जाईल शिरून
पाऊस घेईल घेरून
अंग टाकेन भिजून
मन मात्र कोरडं होईल
खरंच तुझी आठवण येईल

• रघुनाथ सोनटक्के

२५ मार्च २०१९ च्या दै. बलशाली भारत (५ एप्रिल २०१९) आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित

Sunday, 17 March 2019

पळसाचं झाड

« पळसाचं झाड »

किती सोसतोय
विरहाच्या झळा
रानामधे एकटा
राहिलो मी तोळा

आशेचे अंकूर
प्रेम‍ाचा फुलोरा
वैरी तो माझा
हाताचा बिलोरा

सालाने चढलाय
माझ्या गावात बहर
भरू दे रंगाने
तुझं लखलखतं शहर

कोळून फुल‍ांना
काढून घे रंग
रंगेन तुझे वस्त्र
घट्ट माझ्या संग

वर्षातून एकदाच
आठवण तू काढ
वाट पाहते बघ
ते पळसाचं झाड
रघुनाथ सोनटक्के 

१६ मार्च २०१९ च्या दै. युवा छत्रपती, बलशाली भारत आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
२४ मार्च २०१९ च्या दै. तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित  
१२ मे २०१९ दै. विदर्भ मतदारमधे प्रकाशित, ९ जून २०१९ दै. गाववाला मधे प्रकाशित
१३ जून २०१९ दै. गाववाला मधे प्रकाशित



Tuesday, 26 February 2019

आठवणीत रमतांना

« आठवणीत रमतांना »

तुझ्याकडे बघितल्यावर
तू हलकंच हसायचं
म्हणायचं काय मला
तुला सारं कळायचं

रांगोळी तुझी पाहतांना
मन रंग रंग व्हायचं
तिरप्या नजरेने तुझ्याकडे
चोरून मग बघायचं

मागे वळून पाहतांना
खुदकन तू हसायचं
तू मला मनात अन्
मी फुलागत जपायचं

मी तुला बघायचं 
अन् तू गोड हसायचं
तुझं नि माझं सदा
असंच चालत असायचं

गेलीस सोडून दूर
आता कसं जगायचं?
नकळत प्रेम डोळ्यातून
अश्रू होऊन गळायचं

लिहीलेलं नाव हृदयावर
सांग कसं खोडायचं?
बांधलेलं घर प्रेमाचं
का स्वत:च मोडायचं?

हृदयातून आता तुला
सांग कसं काढायचं?
आठवणीत रमतांना
तुला असंच जपायचं...

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. ८८०५७९१९०५

२६ फेब्रुवारी २०१९ च्या दै बलशाली भारत मधे प्रकाशित
१६ जून २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
Raghunath SontakkeRaghunath Sontakke


Wednesday, 20 February 2019

तू

तू

कवी मी, कविता तू
विषय तू, आशय तू

प्रेरणा तू, कल्पना तू
उपमेय ना, उपमाच तू

सागर मी, सरिता तू
आकाश मी, धरा तू

पियानो मी, तार तू
ताल मी, सुर तू

नयन मी, स्वप्न तू
जीवन मी, आशा तू

• रघुनाथ सोनटक्के

१९ फेब्रुवारी २०१९ च्या साप्ताहिक 'सायबर क्राईम'ला प्रकाशित 
१६ मार्च २०१९ च्या तरुण भारत (नागपूर) मधे प्रकाशित 
२७ डिसेंबर २०१८ च्या लोकमंथन मधे प्रकाशित

Tuesday, 1 January 2019

बायकोची आठोन

« बायकोची आठोन »

तु गेली सोळून मले
आता तुई आठोन ईवुन रायली
भाकरीचा झाला वांदा
तु माहेरी पोया खाऊन रायली

कोणी कितीबी मना बा
बायकोची सर ना ईवुन रायली
दुद चाललं ऊतू गॅसवर
अन् मॅगीबी जवुन रायली

कपळे धुवा मना तं
नुसतं बॅट ऊळून रायली
मले खायाले कुटके
अन् तु तिकळे भजे तळून रायली

जातांना मनली रागात
तुमाले लयच चळून रायली
दूर जावुन गळ्या मले
तु भारी घळून रायली

टिवी पावाव कितीखेप
मोबाईलची चार्जिंग उळून रायली
या सार्‍यामदे काय मजा
तिकळून नुसतं मले फटू धाळून रायली
• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905
  शब्दरसिकचा एप्रिल अंक: http://bit.ly/Rasik-Apr18
वात्रटिकासंग्रह: https://goo.gl/7CcLUw
दिवाळी अंक २०१७: https://goo.gl/RxRw8g

२ जानेवारी २०१९ च्या दै. पुण्यनगरी (विदर्भ आवृत्ती) मधे प्रकाशित
Raghunath Sontakke

Wednesday, 26 December 2018

पथीक

पथीक
 
फुले आहेत गोड म्हणून 
सहज त्यांना तोडू नकोस
पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस

खुशाल हसू दे जनास
दुःखावर आपल्या
कुणामुळे तू दुःख आपले
मनातल्या मनात गिळू नकोस

वेगळ्या वाटेचा तू पथीक
सहज कुणी अडवेल वाट तुझी 
संकटांचा साचेल ढीग पुढयात
तरी मनाने खचू नकोस

झालीच नाही कुणा मदत तुझी 
हात मागे कधी ओढू नकोस
पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस

चालत रहा पुढेच
नकोस करू लक्ष विचलीत
कुणी हिणवेल, कुणी रडवेल
भिक त्यांना घालू नकोस

होतील तुझ्याही चुका हजार
शल्य कधी मनात ठेऊ नकोस 
चुकल्यांना वाट दाखव
एकटं कुणा तू सोडू नकोस

पथ आहे काटेरी म्हणून 
अर्ध्यावरती सोडू नकोस


 रघुनाथ सोनटक्के
दि. २६ मार्च २०१५


२७ डिसेंबर २०१८ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित 
Raghunath Sontakke