Thursday, 19 July 2018

परत ये सखे

« परत ये सखे »

ना जाऊस दूर । मला सखे दुर ।
आसवांचा पुर । आवरेना ।।

जगु कसा मी गं । सांग तुझ्याविणा ।
छळतात सदा । आठवणी ।।

हर श्वास घेतो । सदा तुझे नाव ।
सापडेना गाव । माझे मला ।।

श्वास तु माझा । तडफडे जीव ।
झाला कासाविस । तुझ्यासाठी ।।

सहन ना होत । हा विरह तुझा ।
आसावला जीव । भेटावया ।।

परत ये आता । हाक देतो जीव ।
ओठी तुझे नाव । क्षणोक्षणी ।।

रडतो तुझ्यासाठी । जीव माझा भोळा ।
झालो मी वेडा । तुझ्यापायी ।।

  • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905

२० जुलै २०१८ च्या दैनिक डहाणू मधे प्रकाशित 


Wednesday, 11 July 2018

उघाड

« उघाड »


Calligraphy by Raghunath Sontakke

अशी देली रं उघाड
पिकांनी टाकली मान
हुलकावणी दिली गड्या
कंठाशी आलाय प्राण

होतं नोतं टाकलं मातीत
जीव ओतला सारा
कष्टाचं होऊ दे सोनं
रानी गुंजतो फकस्त वारा

पिढी खपली रानात
दान पडू दे रं पदरी
पोटाला अन ल्याला काप्डं
मुक्याला मिळंल बाजरी

वार्‍यासंग ढगबी पळती
रातीला पडतं चांदणं
फाटक्या झोळीला भरू दे
हाय एवढंच आम्चं मागणं

उन्हातान्हांत खपुन झालं
अन् तुजं अस्मानी वागणं
भुईसंग आसावला जीव
अन् मेघा तुजी वाट बघणं!

अन् मेघा तुजी वाट बघणं!


• रघुनाथ सोनटक्के

   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

१९ ऑगस्ट २०१८ च्या दै. लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित
२२ जुलै २०१८ च्या दै. तरुण भारत मधे प्रकाशित 
१२ जुलै २०१८ दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
 १५ जुलै २०१८ च्या दै. विदभ मतदार मधे प्रकाशित
१५ जुलै २०१८ सा. कल्याण टाईम्स मधे प्रकाशित

                                Vidarbha Matadar - Raghunath Sontakke
Kalyan Times - Raghunath Sontakke







Tuesday, 19 June 2018

पुस्तक समीक्षा: मनाचा धांडोळा घेणारा काव्यसंग्रह 'कंगोरे मनाचे'


« पुस्तक समिक्षण »

पुस्तक समीक्षा: मनाचा धांडोळा घेणारा काव्यसंग्रह 'कंगोरे मनाचे'

श्री. देविदास खडताळे यांचा 'मनाचे कंगोरे' हा कवितासंग्रह हे त्यांच प्रकाशित झालेलं नववं पुस्तक आहे. याचा अर्थ त्यांचं साहित्यातील 'व्याकरण' चांगलंच बळकट आहे. प्रतिमा, प्रतिकांचा मनाच्या अवस्था रेखाटण्यासाठी त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे, हे त्याचं काव्य वाचल्यावर कळतेच. पुस्तक वाचायला घेतल्यावर सुरवात मुखपृष्ठापासुन होत असल्यामुळे पुस्तकाचं नाव अाणि मुखपृष्ठचित्र याचा संबंध वाचक लावत असतो. शिवाय पुस्तकाच्या आत काय 'लिहून' ठेवलंय याचाही अंदाज घेत असतो. 'मनाचे कंगोरे'ला समर्पक आणि थोडंस गहन वाटणारं मुखपृष्ठ लाभलं आहेच. आता वळूया कवितांकडे.

एकून चाळीस पानाच्या छोटेखानी अंकात ३४ कविता असून जवळपास सर्व कविता मनाचे पैलू दर्शवतात. 'मन' हा शब्द म्हटला कि 'ती' बहिणाबाईची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. देविदासजींचीही अशीच एक कविता आहे, मात्र त्यांच्या विशेष पठडीतली. कवीला मन हे पावसासारखं 
   कधी रिमझिम
   कधी खट्याळ
   कधी फटकारे
   कधी विक्राळ
वाटतं. 

आपण या जगाला स्वार्थी म्हणत असतो. मात्र समाजाचा अापणही भाग असतो, हेही खरंच! थोड्याफार प्रमाणात सारेच स्वार्थी असतात. कदाचित निर्सगनियमच बनुन गेलाय हा. या गुणामुळे (मुळात अवगुणच) माणसात काय विपरित बदल होतात हे देविदासही त्यांच्या बर्‍याच कवितांमधून मांडतात. 
    स्वार्थात गुरफटल्याने
    कधी अमानुष्य होते मन
    कधी माणुसकी हरवते
    कधी विषण्ण होते मन...

 मनाला स्वार्शी बनवणारे कंगोरेपण किती असतात. कधी हे मन हेकेखोर, अहंकारी, असत्य, अविश्वासू असं बरंच काही बनतं. या स्वार्थी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. माणसाला येथील ऐहिक सुखाचा, मायेचा मोह आवरता येत नाही. अगदी अंतापर्यंत तो त्याला कवटाळून बसतो. सोबत काही येत नसूनही का बरं एवढा हव्यास करावा हा प्रश्नच आहे. कवीलाही हा प्रश्न पडल्यावाचून राहीला नाही. त्यासाठीच कि काय यावर उपाय म्हणून ही स्वार्थी नाती कशी माणुसकीने जपता येतील यासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं तो म्हणतो. स्वार्थाची झापड लावणार्‍यांना माणुसकीने नागवण्याचा प्रयत्न आहे. हेवेदावे करणार्‍यांना आपलेपणाची जाणिव कशी करावी, अशी चिंताही आहे.

 कधी मन फुलाचे कोंब होते तर त्याहूनही नाजूक पानावरील दवांचं मोतीरूप घेते. कधी लवचिक तर कधी कठोरही होते. त्याची ना खोली कळत, ना व्याप्ती.
'मनोमनी' कवितेतील एक कडवं यासाठी पुरेसं आहे.
   मन किती खोलवर
   मनघट्ट कितीतरी
   खोलात खोलवर जसे
   दगडात उमललेले फूल जसे

मनाची श्रध्दा हा सुध्दा एक भाग असतो. कुणी दगडावर तर कुणी माणसावरही श्रद्धा ठेवायला तयार होत नाही. शेवटी हा मनाचाच खेळ आहे. श्रध्दा आणि जोडीला क्षमतेच्या बळावर आपण हवं ते अपेक्षित साध्य करू शकतो. दगडाला गुरूस्थानी ठेवलेल्या श्रद्धेने आणि आपल्या कार्यप्रवणतेने यश मिळवु शकतो. कवीलासुध्दा याच क्षमतेवर श्रध्दा आहे. मग त्याला देवाला पुजलं काय किंवा आस्तिक असलो काय, नसलो काय याचा काही फरक पडत नाही. अशीच भूमिका 'श्रध्दाच', 'घाव'  या कवितांमधून विषद केली गेली आहे. 'निरंतर' कवितेतून स्वत:ला शोधण्याचा सल्लाही दिला आहे. 

दुःख सहन करणे हे काही नवीन नाही. प्रत्येकाला त्याचा सोस सोसावाच लागतो. कुणाला थोडं सहन करावं लागतं, तर कुणाला निखार्‍यावरून चालावं लागतं. रानातल्या भेसुर रात्रीने मनाचं फुलं उन्मळून जातं आणि मन निर्माल्यागत होऊन जातं. मनाचा हा गुणधर्म भुतकाळ‍च्या आठवणीने आणखीनच अक्राळविक्राळ होतो. गुणधर्म कवितेत कवी म्हणतो, 
    मन माझे आक्रोश करी,
    भूतकाळाच्या निखार्‍याने
    जमलीय त्यावर राख
    भूतकाळाच्या आठवणीने

अशाच विरक्ती आणि विरहाच्या जखमा भुतकाळात दडलेल्या असतात आणि आठवणीने मन व्याकुळ, बैचेन होतं. डोळे पाणावतात आणि मनात काहूर माजतं. अशी दशा 'विरक्ती' या कवीतेत मांडली गेली आहे. तसेच 'निखारे' या कवितेत,
   आठवणी ओठातूनी
   मन फसवूनी सुर गेले,
   राखेतले निखारे
   मन जाळून मैफल गेले
अशी आपली फसगत कवी मांडतो.
पण यातून मार्ग काढण्यासाठी मन धैर्य करतं. आशेची पालवी फुटायला लागते. मन वळवाचा पाऊस घेवुन येतो. असंच कुणीतरी मग 'उपासनिय' होतो.
   मन वळवाचा पाऊस
   आठवणीचे निखारे, शिंपत गेला,
   करपलेल्या, भेगाळलेल्या
   आठवणींना ओल देवून गेला

 धैर्यांची आणि आशेची वाट लाभणारं मन सर्वांचंच असत नाही. कुणी परिस्थितीला शरण जाणारंही असतं. प्रतिकुलतेशी दोन हात करायला सर्वांनाच जमत नाही. दु:खातही आनंदी राहणं शिकलं पाहिजे असं वाटत राहातं. असे सर्व प्रश्न कवीला पडल्यावाचून राहत नाहीत. या प्रश्नांची उत्तरं ज्यानं त्यानं शोधायला हवीत.
 एकंदरीतच या जगाच्या 'गर्दी'त मनाचे 'चढउतार' मनाचे सामर्थ्य सिद्ध करतात. नाहीतर हे आयुष्य 'कोडं' बनुन जाते. त्यात हा संग्रह मनाचा धांडोळा घेण्यात खरा उतरला आहे.
 पुस्तक वाचताना त्याचं रसग्रहण केल्यावरच कवीचं किंवा लेखकाचं मन कळंत असतं. त्यानुसारच हे पुस्तक मनाचे कंगोरे समजून घ्यायला खरं उतरलं आहे असं मला वाटतं. राहिला प्रश्न यातील त्रुटींचा. 
 संग्रहाच्या नावाप्रमाणे विचार केला तर सर्व कविता एकाच विषयाला धरून असायला हव्यात. मात्र एक-दोन कविता विषयाशी फारकत घेणार्‍या ठरतात. त्यांऐवजी विषयाला धरून आणखी कवितांना संग्रहात जागा देता आली असती. तसेच या पुस्तकाला प्रस्तावना घेता आली असती तर आणखी बरे झाले असते. मनात वसलेल्या आप्तेष्टांना समर्पित केलली अर्पणपत्रिका सारं काही सांगुन जाते.

शेवटी, देविदास खडताळे यांना पुढिल साहित्यप्रवासास सुभेच्छा!

पुस्तक: कंगोरे मनाचे
कवी: श्री. देविदास खडताळे
प्रकाशक: वैशाली प्रकाशन, पुणे
मूल्य: रु. ७०

समिक्षण: रघुनाथ सोनटक्के
        तळेगाव दाभाडे, पुणे

        मो. 8805791905





Monday, 21 May 2018

आवडतं का तुला ?


 « आवडतं का तुला ? »  


तुझ्यासाठी झुरणं 
मागोमाग फिरणं 
रात्ररात्र जागणं 
वेड्यासारखं वागणं 
     आवडतं का तुला ?

मित्रांनी चिडवनं 
तुझ्यावरून खिल्ली उडवणं 
भेटण्यासाठी तू रडवणं 
कुणाशी भिडवणं 
    आवडतं का तुला ?

तुझ्यासारखा मला होतो त्रास 
जगण्यासाठी हवाय ना श्वास 
तू आहेस माझ्यासाठी खास 
तुझ्यावरचा  विश्वास तोडणं 
    आवडतं का तुला ?

रघुनाथ सोनटक्के
   फोन: 8805791905

१७ जूनच्या दै. विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित 


Saturday, 17 February 2018

अंतरिचे बोल


« अंतरिचे बोल »


घाव केले हृदयी
जखमाही केल्या खोल
कविता होऊन पडले
मनी अंतरिचे बोल
     न पुसता केले प्रेम
     सदा साठवले मनात
     वाहले अश्रू नयनातुन
     काय हेच त्याचे मोल
विसर पडला जगाचा
आठवणीतही तुझे राज्य
आधाराविणा ढळलो
सावरू कसा तोल
     प्राण माझा, स्वप्न माझी
     होते सारे तुझ्यासाठी
     मला हवे होते फक्त
     दोन प्रेमाचे बोल
येईल वर्षा कधीतरी
फुटेल पालवी फांदीवर
गाईल पुन्हा कोकिळ
वर्षागिताचे बोल
     कविता होऊन पडले
     मनी अंतरिचे बोल

• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे (पुणे)
  मो. 8805791905


दै देशोन्नती मधे प्रकाशित 

तुझ्यावर

तुझ्यावर

निसर्गानं ऋतुवर करावं
तसं प्रेम तुझ्यावर केलं

       माळ्यानं फुलावर
       पाखरानं पिलावर
       तसं प्रेम तुझ्यावर केलं
पक्षानं झाडावर
पानानं दवांवर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
        मातेनं गर्भावर
        जीवानं श्वासावर
        तसं प्रेम तुझ्यावर केलं
तटानं नदीवर
माशानं पाण्यावर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
       नभानं धरेवर
       सूर्यानं जगावर
       तसं प्रेम तुझ्यावर केलं
राघुनं मैनेवर
कान्ह्यानं राधेवर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
      • रघुनाथ सोनटक्के
         तळेगाव दाभाडे (पुणे)
         मो. 8805791905
        
दै देशोन्नती मधे प्रकाशित
१५ सप्टेंबर २०१९ विदर्भ मतदारमधे प्रकाशित
Raghunath Sontakke