Monday, 29 January 2018

नकोस

« नकोस »

आधीच तुटलोय मी
पुन्हा तोडू नकोस
सोसलंय बरंच काही 
पुन्हा छळू नकोस

हळूवार तुझं अागमन
देवून गेलं गारवा
आशेच्या पालवीला  
पुन्हा जाळू नकोस

तुझं हसणं, बोलणं
लाजणं तुझं भारी
आवडतेस तु खुप
सोडून जाऊ नकोस

नभांसारखं तुझं मन
धरणीसारखे डोळे
ह्रदयाला माझ्या तू
तोडून जाऊ नकोस

स्वप्नांचा बांधलाय इमला
आहे गरिबाची झोपडी
पाहून कुणाच्या महालाला
मोडून जाऊ नकोस
• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. ८८०५७९१९०५

दि. २४ जून २०१८ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित 









Monday, 22 January 2018

शब्द

 « शब्द »
Shabda-Raghunath Sontakke

शब्द तोडतात क्षणात मनामनातील नाती
शब्दच होतात कधी शिपंल्यातील मोती

धन, देह नश्वर, शब्दच उरतात अंती
वाफ होऊन तरंगत राहते बाकी आसमंती

शब्दच पसरवतात हिंसा, भेद, मत्सर विखारी
कुणी शब्दांचा रसिक, तर कुणी असतो भिकारी

कुणी करावा जप शब्दांचा, कुणी कराव्या ढाली
कुणी व्हावा अंगार, तर कुणी कराव्यात मशाली

शब्दानेच होतो ‘वाल्मिकी,  कुणी होतो मवाली
शब्दच होतात गोड, बाकी सारं त्याच्या हवाली

शब्द कायदा, शब्द वायदा, कुणाचा असतो कव्वाली
त्यानेच होते शिक्षा, समाधान, अन् भावाची वसुली

         • रघुनाथ सोनटक्के, मो. 8805791905

१ नोव्हेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित  
२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित
 

Wednesday, 22 November 2017

फार झाले

फार झाले
चाखुन फार झाले शब्द तुझ्या ओठीचे
काढून फार झाले अर्थ त्या मिठीचे

नाव ना सुचले तुज आपल्या नात्याला
वापरून फार झाले शब्द मज गाठीचे

गायले मी तुजसाठी प्रोचे तराणे
काय झाले आता गोड त्या भेटीचे

खंबीर होती तु हरवेळी मजसाठी
मग कारण काय होते कुठल्या भीतीचे

मजसाठी तु झुगारले बंध वेळोवेळी
मग पाळले नियम तु कोणत्या रितीचे

- रघुनाथ सोनटक्के
8805791905

मासिक साहित्य चपराक मधे प्रकाशित 

Monday, 21 August 2017

जोडी

« जोडी »

व्व्या-पव्व्याची जोडी
आहे तुझ्या संगतीला
   कोमजु नये पिक
जीव लागे टांगणीला

  बहरंल पिक शेतात
  जशी झुल अंगावरं
  जरी घालतो वैरण
जीव तुह्या बांधावरं

   वाजती कसांड्या
घुमे नाद किणकिण
   श्रावणातही दिसे 
  रोपं हिर्वी ईनमीन

शिंगाना लाल-पिव्वा
   रंग देवुन रं छानं
  जसं रंगंवलं शेतं
आम्हासंग जोडीनं

  तासली दोन शिंगं
गळ्यात झुंबर छानं
   पाठी तुझा हात
आवडे ते औक्षवणं

खाऊ घालीतो ठोंबरा
गोड लक्षुमीची माया
  पोरासोरांना जेवु दे
गोड पुरणाच्या पोया

• रघुनाथ सोनटक्के
8805791905

(दि २० मे २०१८ च्या दै.  विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित ) 
http://vidarbhamatadar.com/upnews/20052018/Dainik-4.pdf

(६ ऑक्टोबर  २०१८ च्या दै. डहाणू मित्र मध्ये प्रकाशित )



जोडी

ढव्व्या-पव्व्याची जोळी
हाय तुया संगतीले
कोमजु नोको पीक
जीव लाग्ला टांगनीले

बहरलं पीक वावरात
जसी झुल अांगावर
जरी घालतो चारा मले
जीव तुह्या बांधावर

वाजतात कसांड्या
घुम्ततात किनकिन
श्रावणातई दिस्ते
रोपं हिर्वी ईनमीन

शिंगाले रंगोलं तुया
लाल-पिव्व्या रंगानं
जसं रंगोलं वावर
आम्च्यासंग जोळीनं

तासली दोन शिंगं
गयात झुंबरं रे लेनं
पाठीवर तुया हात
आवळते औक्षवनं

खाऊ घालतो ठोंबरा
गोळ लक्षुमीची माया
पोरासोरांयाले जेवु दे
गोळ पुरणाच्या पोया
• *रघुनाथ सोनटक्के*
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. ८८०५७९१९०५


Monday, 22 August 2016

पाऊस

पाऊस  - रघुनाथ सोनटक्के



काड्यांची छत्री
श्रावणाचा पाऊस
माझ्याविणा नको
गाणे 'ते' गाऊस

भिजलेला पदर
ओला ओला पाऊस
रूपासाठी नको
आणी काय लेवुस

खिडकीतुन डोकाव
रिमझिम पाऊस
माझ्याविणा नको
गरम चहा पिवुस

गार गार वारा
आणतोय पाऊस
चुलीमधे नको
माझं मन जावुस

तेच जुनं पुस्तक
परत तोच पाऊस
जुन्या त्या गुलाबाचा
गंध नको घेवुस
• रघुनाथ सोनटक्के


९ जून २०१८ च्या दै. युवा छत्रपतीमध्ये प्रकाशित
२४ जून २०१८ च्या दै. तरुण भारत, अक्षरधारा पुरवणी मध्ये प्रकाशित 
९ सप्टेंबर २०१८ च्या दै. जनशक्ती (मुंबई) मधे प्रकाशित
http://epaper.ejanshakti.com/1808853/Mumbai-Janshakti/09-09-2018#page/8/1
१८ ऑगस्ट २०१९, दै. तरुण भारत, आसमंत पुरवणीत प्रकाशित
२२ ऑगस्ट २०१९, दै. एकमत साक्षी पुरवणीत प्रकाशित
१० सप्टेंबर  २०१९ दै. सकाळ, अकोला मधे प्रकाशित   
१ सप्टेंबर २०१९ दै. हिंदुस्थानमधे प्रकाशित





Monday, 18 July 2016

घडू नये पाप

घडू नये पाप
(बलात्काऱ्याला उद्देशुन)




नकोस करू अत्याचार
छळू नकोस दादा
आई-बहीण माझ्यासारखी
असेल तुला सुद्धा

असा कसा वागू शकतो
मीपण आहे कुणाची ताई
जनावरासारखा वाग म्हणुन
काय सांगते तुझी आई

क्षणापुरत्या वासनेसाठी
जाळतो माझा देह
तुझ्या आईबहिणीलाही
का करतो असा स्नेह

राहून राहून येते मला
माझ्या आईबाबांची याद
तू तर जाशील सोडून
सावरेल कोण माझ्या बाद

छळतील लोक तुला
पिळतील माझे शरीर
जगशील अपमानित
वाटू दे फिकीर

आग दाबून शरिराची
शहाण्यासारखं वाग
आतमधल्या सैतानाला
ठेचून तू काढ
रघुनाथ सोनटक्के
तळेगाव, पुणे, 8805791905

३१ डिसेंबर २०१८ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित

Raghunath Sontakke

Thursday, 7 July 2016

आषाढाचे गित

आषाढाचे गित
                      
चातकाला लागे, कृष्णमेघाची अोढ
वाट पाहे वसुंधरा, येतो कधी आषाढ

नृत्य करी मयुर, बरसता जलधारा
प्रेयसी होय धुंद, झोंबता मंद वारा

गाऊ लागे मेघ मल्हार, साद देई विज
झोपडीत म्हणे माता, क्षणभर निज

घालती भक्तगण, विठ्ठलास साद
चंद्रभागेत मिसळे, टाळ मृदंगाचा नाद

प्रतिक्षा संपुन, न्हाऊ निघाली सृष्टी जणू
निरखुन पाहे देवेन्द्र, रूप त्याचे धणु

पाहण्या सारकाही, सुर्य ढगामागुन हसतो
हसु किती चैतन्यदायी, कृष्णमुरारी भासतो

झाली तृप्त धरणी, आनंदले सृष्टी चराचर
भुमिच्या कुशीतुन, डोकावे तृणांकुर

वसुंधरेने पांघरला, नवा हिरवा शालु
पक्षी-वृक्ष उल्हासुन, जणु लागले बोलु

नाचलो मी जलधारात, नाचली माझी प्रित
गावे सर्वांनी या, आषाढाचे गित


- रघुनाथ सोनटक्के -
तळेगाव, पुणे

 880 579 1905

( माझी प्रथम प्रकाशित कविता )


१९ जुलै २०१८ च्या दै. नवाकाळ मधे प्रकाशित 
२४ जुलै २०१८ च्या दै. युवा छत्रपती आणि २२ जुलै २०१८ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
दै. २२ जुलै २०१८ च्या दै. डहाणू मित्रमधे प्रकाशित