Monday, 23 December 2019

न्यायाची दिरंगाई

न्यायाची दिरंगाई
मोर्चे, मेणबत्त्या पेटवणे
अन् व्यर्थ चर्चांचा खल
दिरंगाईच वाढवत आहे
गुन्हेगाराचे मनोबल

आजही प्रतिक्षेत आहेत
लाखो बलात्काराचे दावे
कधी मिळेल न्याय त्यांना
अन् कधी निराकरण व्हावे

कायदा आणि न्यायालय
पडत आहे पांगळे आणि लुळे
कित्येक निष्पापांचे जीव
जात आहेत खरेतर याचमुळे!

एकविसाव्या शतकात
महाशक्तीची पाहत आहोत स्वप्ने
आकडेवारी फुगली कि
वाढले आहेत उगीच हे गुन्हे?

बर्‍याचवेळा दिली जाते
याला जाती-धर्माची झालर
राजकारणीही करत आहेत
त्याचा हवा तसा वापर

वर्षानुवर्षे गुन्हेगार मोकाट
म्हणजेच मिळत राहते माफी
धाक आणि जरब बसावी
मग धजावणार नाही पापी
रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

१० डिसेंबर २०१९ च्या साप्तहिक सायबर क्राईम मध्ये प्रकाशित.

Monday, 2 December 2019

दिवाळी


दिवाळीचा उत्सव

प्रकाशाचा उत्सव दिवाळी 
सगळ्यानांच दिसावा 
उपेक्षित कुणी या जगी 
उपाशी ना निजावा 

मनामनात पेटाव्यात 
दया आणि  शांतीच्या ज्योती 
विजय करू अंधःकारावर
पेटवूया ज्ञानाच्या वाती 

दंभाला द्यावे पेटवून 
चेतवून द्यावे विकाराला 
सत्याचा जळो दीप 
दूर लोटून अन्यायाला 


 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

२७ ऑक्टोबर २०१९ च्या दै विदर्भ मतदारमधे प्रकाशित

परतीचं पानी

परतीचं पानी
गेला श्रावण कोरडा
पीक सारं होतं सुकलं
दुबारनी आलेलं हाताशी
तेही आता आहे हुकलं

भीजलं सारं सोयाबीन
ज्वारी झाली काळीभोर
रबी गेला घेऊन पीक
खरिपाची तोडली डोर

कोसळला भरीव धान
कणसाला फुटले कोंब
उराशी बाळगलेल्या सार्‍या
सपनाचा झाला होम

वावरात साचलं पाणी
पीक पिवळसर पडलं
भरल्या माठाला गड्या
एका रातीतच तोडलं

कपाशीचा गळला फुलोर
सडल्या आतून बोंड्या
काळा पडला कापूस
जशा बकरीच्या लेंड्या

आधी देली हुलकावणी 
आता ज्यादाचं पडलं
वाकलेलं माझं कंबरडं
अजुनच आहे मोडलं  
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. ८८०५७९१९०५
साप्ताहिक कृषकोनती २० ऑक्टोबर २०२०
Raghunath Sontakke



परतीचं पानी
(वर्‍हाडी)

गेला सरावन कोळ्लां
अगाईत त्वा चिमोलं
दुबारनी आलं हातासी
तेई आता लांबोलं

सळ्ळं सारं सोयाबीन
जवारी झाली काईभोर
रब्बी गेला घेऊन
खरिपाची तोळ्ली डोर

मोळ्ळे लंबे धांडे
कनसाले फुटले कोंम
देल्ला फिरून पोतेरा
सपनाचा झाला होम

भरल्या वावरात डाबरी
पीक पिव्वं धम पळ्लं
भरल्या माठाले गळ्या
एका रातीतच तोळ्लं

पराटीचे गयले फुलं
सळ्ळ्या अंदरून बोंड्या
काया पळ्ळां कापुस
जश्या बकरीच्या लेंड्या

आदी देल्ती चाट
आता ज्यादाचं पाळ्लं
वाकेल मायं कंबळ्लं
आजुनच हाय मोळ्लं
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे

३ नोव्हेंबर २०१९ च्या दै. विदर्भ मतदार आणि दै लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित 





वाटते

वाटते 

नागमोडी वाट
कौलारू ती घरे
ओढ वाटते

नदीकाठी मंदीर
आणि गावजत्रा
रोड वाटते

रानातला वारा
पावसाची सर
गोड वाटते

गावकरी मुद्रा
आता ती ओळख
गाढ वाटते

आठवण झोके
प्रेमातील धोके
मोद वाटते

जुनीच ती खाट
अथांग अभाय
शोध वाटते

मतलबी जन
धावे सारे जग
खेद वाटते

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

३ नोव्हेंबर २०१९ च्या दै तरुण भारत, आसमंत पुरवणीत प्रकाशित
१२ जानेवारी २०२० च्या दै विदर्भ मतदार मधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 

सीतादई

सीतादई
बहरलं हिर्व रान
आली पर्‍हाटी फुलून
दह्यावानी पांड्डापट
निंगे कापुस ऊलून

टोचे बोटाले कच्कन
त्याची धारदार नखं
बाई खंदाळी येचता 
गेले दुखून वं बखं

तपे सुर्य अभायात
झाल्या बोंडाच्या चांदन्या 
संध्याकाई ईन बंडी
भरले गठोळे बांधन्या 

वाजे कसांड्या पांदीनं
आला घ्याले घरधनी
भरल्या खंदाळ्या पाऊन
जीव गेला हरकुनी

हात लावा वं सयाव्हा 
घेते पान्याचं भरनं
बरबटी शेंगा-भेंडं
जमा केले त्यात वरनं

चार गाठोळे बसले
ऐकमेकाले खेटून
गादी कर्‍याले जरासा
औंदा ठेवतो राखून

किस्न निजे पायन्यात 
ऊतू गेलं लाह्या-दही
देवा! पिकू दे असंच 
आता झाली सीतादई
रघुनाथ सोनटक्के
२४ नोव्हेंबर २०१९ च्या दै मातृभूमी (अकोला) आणि विदर्भ मतदार (अमरावती) मधे प्रकाशित
३ डिसेंबर २०१९ च्या सायबर क्राईम मध्ये प्रकाशित.
७ जाने. २०२० च्या साप्ताहिक कृषकोन्नती मधे प्रकाशित.
Raghunath Sontakke





Tuesday, 17 September 2019

माणुसपण

माणूसपण

भुकेल्या, तहानलेल्याला
अन्नपाणी देणार्‍या गाडगेबाबात
मला माणूसपण दिसलं

देश, ग्राम, शेतकर्‍यासाठी
गाणार्‍या तुकडोजीच्या,
खंजेरी बोलात
मला माणूसपण दिसलं

दलितांसाठी जगणार्‍या
रात्रदिन झटणार्‍या,
स्व जागवणार्‍या,
बाबांच्या लेखणीत
मला माणूसपण दिसलं

स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या
अहिंसेच्या 'हे राम' मधे
मला माणूसपण दिसलं

अज्ञानाच्या अंधारात
क्रांतीची ज्योत पेटवणार्‍या
सावित्री-ज्योतिबात
मला माणूसपण दिसलं
• रघुनाथ सोनटक्के

प्रकाशित

Wednesday, 4 September 2019

गुर्जी

 
• गुर्जी •
 

Raghunath Sontakke

पांड्डे कप्ळे घालत
साधे आम्चे गुर्जी
शिकोयाले फक्त खळू
होती तुट्की खुर्ची

भिंतीवर काया फळा
हातात फांदीची छळी
घाबरत जावो सग्ळे
पन वाटत जाये गोळी

शिकोयाले व्हते कळक
आतून लोण्याचा गोया
काळून आणत घरातून
राये परतेकावर डोया

मातीच्या गोयाले देला
संस्कारासंगं आकार
झ्याक शिकोलं गणित
वेलांटी, मात्रा, ऊकार

शिक्षणाचं पेरून बी
लावलं आमाले अत्तर
विचारलं कोन्ताई प्रश्न
तं हजर व्हतं उत्तर

पाजलं वागीनीचं दुद
उघळला तिसरा डोया
आठोनीत हायेत गुर्जी
जसा अत्तराचा फाया

• रघुनाथ सोनटक्के
(प्रकाशित)


१५ सप्टेंबर २०१९ तरुण भारत (नागपूर) आसमंतमधे प्रकाशित
८ सप्टेंबर २०१९ विदर्भ मतदारमधे प्रकाशित