Monday, 9 March 2020

धुयमाती

धुयमाती
धुयमातीच्या दिसी
पक्या लय व्हता पेला
रंंग हाताले लावुन थो
घरी दोस्तायच्या गेला

घेत्ली त्यांनं देसीची
दोस्तायसंग क्वाैटर
नेम त्याचा दिसेच मले
हा घळोते भलतं मॅटर

दोस्तमीत्र त्याले भलकसे
चळोतं हरभर्‍याच्या झाळावर
हा तं मंग समजे जसा
चळ्लो आपुन गळावर

दोस्तायनं त्याच्या मंग
गटारात त्याले घातला
ज्यादा झाली दारू तं
मंग भदाभदा वक्ला

वैनी-वैनी करत थो
शालीच्या घरी मंग पोच्ला
रंगानं भीजोयाले तिले
पक्या रंदावनातच बस्ला

सोळा म्हणे मले तुमी
शाली बोलून भल्ली थक्ली
जानकुळ काळून चुलीतलं
मांग भलकसी लागली

घरात आपल्या घुसत
पक्या बायकोमांग लपला
माहित पळ्ळ्यावर मामला
बायकोनई बम चोप्ला

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

२६ मे २०२०,  आदर्श महाराष्ट्र
Raghunath Sontakke


 

Friday, 6 March 2020

पक्याचा वैलेंनटाईन

 वर्‍हाडी कविता

पक्याचा वैलेंनटाईन

(वर्‍हाडी कविता)
 
वैलेंनटाईनच्या दिसी
पक्या उट्ला पायटी
आंग धून रेडी झाला
कदी नाई तो नवती

सेंट मारला बगलीत
बुटाले केली मालिस
खटारा गाळी बनोली
जसी नवी काॅलीस

पक्या चाल्ला व्हता
हातात गुलाब घिवुन
येतो म्हणे कालेजात
एका पोरीले त्या दिवुन

रस्त्यात भेट्ली चंदाबुडी
आळोला तिनं रस्ता
पळनार व्हता त्याले म्हाग
लाल गुलाब सस्ता

पक्या नेमीच घेत जाये
निरानाम बुडीचे खेटे
चंडायन्या केल्यावर मंग
बुडी भल्ककसीच पेटे

संदी पावुन चांगली
बुडीनं रस्ता अळोला
दे मले फुल मनत
अवाज तीनं वाळोला

हातातला गुलाब नाता
दे रे माह्या देवाले
नाई तं दिन सांगुन
तुया बाप रामभावाले

बुडीच्या ब्लैकमेलमदी
पक्या भल्ता फसला
परपोज गेलं खड्डयात
अन् वैलेंटाईन कस्ला

• रघुनाथ सोनटक्के ©
   (प्रकाशित)

आवडल्यास नावासह शेअर करा.
१९ मे २०२०, दै. युतीचक्र  
Raghunath Sontakke

Tuesday, 3 March 2020

विरह

विरह
किती गं सांभाळू
तुझ्या आठवणी
स्वप्नाळू या मनी
साठविल्या

पेटला विरह
तुडूंब ही आस
विरह नी भास
करे दाह

अतिव ती याद
कोपर्‍यात मनी
घालतो नयनी
साद तुला

शिशिरच ऋतू
मनी पेटलेला
जीव आसावला
हवीच तू

धरेसम मन
जणू फाटलेले
पंख छाटलेले
अंकुरावे

• रघुनाथ सोनटक्के


१ मार्च २०२० च्या लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित.
२४ एप्रिल २०२०, दै . युतीचक्र  
 २५ एप्रिल २०२०, दै. जनमाध्यम
Vatratika, Raghunath Sontakke
Raghunath Sontakke
Raghunath Sontakke

Friday, 28 February 2020

अवकाळी

अवकाळी
सांडून गेल्या बागा
गळून गेला फुलोर
नासवून गेला पीक
पाऊस तो मुजोर !

ओलाचिंब हरभरा,
गळला आंब्याचा मोहोर,
द्राक्ष-डाळींबाचा सडा
केला कहरच कहर ...

कांदा पुरता नासला,
टमाटी, भाजी सडली
रोजी-रोटीची चिंता
पुन्हा नव्यानं पडली

पिकलं होतं सुपानं
फाडला माझा पदर
कसं काढायचं वर्ष
कसं भरायचं उदर ?

नको तेव्हा बरसला
ऐन आल्यावर बहर
डोळ्यादेखत नासवलं
का प्यावं आता जहर ?

देत नाहीस रे तू जे
मी मागितलं मागणं
पटत नाही देवा तुझं
हे अवकाळी वागणं ...
• रघुनाथ सोनटक्के

२२ मार्च २०२०, दै. लोकशाही वार्ता
 २३ एप्रिल २०, दै. युतीचक्र, १ जून २०२० दै आदर्श महाराष्ट्र 
Raghunath Sontakke

Raghunath SontakkeRaghunath Sontakke








Thursday, 6 February 2020

लगन

तुय लगन पोरी
तुय लगन होईन पोरी
तवा जाशीन तू दूर
पण माह्या जीवात आग
अन् ईन डोयात पूर

तुया लगनात पोरी
नाचतीन पोरी-पोरं
मी मातरं एकटाच असीन
लळीन संग वारं

तुया लगनात पोरी
हास्तीन तुये होठ
मले मातरं प्या लागीन
तुया जुदाईचा घोठ

तुया हातावर्ची मेंदी
रंगुन जाईन फार
अन् उळवतीन लोकं
तुया लगनाचा बार

होईन तुयं सुभमंगल
अन् पळीन गयात हार
मी मातरं होईन पोरी
जागच्या जागी ठार

लळशीन तू जवा
सारं जग पाईन
कोनासाठी लळतं
कोनाले ना कईन

मी तुयावर पेरम करतो
फक्त ध्यानात ठेवजो
आठोन आली माही तं
तवा चंद्राकळे पायजो

या जन्मात नाई
तुयं मायं वं मीलन
पुळच्या जन्मी तं
तुया शीवाई ना जमन
• रघुनाथ सोनटक्के
   (प्रकाशित कविता)

२००१ दै. देशोन्नती मधे प्रकाशित

Monday, 23 December 2019

भातकं

भातकं
आबा माह्या आने
भातक्याची पुळी
गुया परीस  राये
लय त्याची गोळी

शेव-चिवळा, जलेबी
कुरकुर थे पापळी
सारे बसत लेकरं अन्
गोल करत साकळी

आजच्या पिज्ज्याले नाई
त्या भातक्याची गोळी
चुलीच्या सैपाकाची सर
गैसवरच्याले थोळी?

कदी भेटे उसाचं कांडं
कधी गुयाची भेली
धावपईच्या जगात थे
मजाच गायब झाली

जीव लावणारे मान्सं
देत चारान्याचं भातकं
लाहनपनी वाटे त्याचं
सुख अभायाइतकं
• रघुनाथ सोनटक्के


२२ डिसेंबर २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित.  
२३ फेब्रुवारी २०२० च्या दै. मातृभूमी (अकोला) मधे प्रकाशित
३१ मे २०२० च्या दै. युतीचक्र


Raghunath Sontakke
Raghunath Sontakke

न्यायाची दिरंगाई

न्यायाची दिरंगाई
मोर्चे, मेणबत्त्या पेटवणे
अन् व्यर्थ चर्चांचा खल
दिरंगाईच वाढवत आहे
गुन्हेगाराचे मनोबल

आजही प्रतिक्षेत आहेत
लाखो बलात्काराचे दावे
कधी मिळेल न्याय त्यांना
अन् कधी निराकरण व्हावे

कायदा आणि न्यायालय
पडत आहे पांगळे आणि लुळे
कित्येक निष्पापांचे जीव
जात आहेत खरेतर याचमुळे!

एकविसाव्या शतकात
महाशक्तीची पाहत आहोत स्वप्ने
आकडेवारी फुगली कि
वाढले आहेत उगीच हे गुन्हे?

बर्‍याचवेळा दिली जाते
याला जाती-धर्माची झालर
राजकारणीही करत आहेत
त्याचा हवा तसा वापर

वर्षानुवर्षे गुन्हेगार मोकाट
म्हणजेच मिळत राहते माफी
धाक आणि जरब बसावी
मग धजावणार नाही पापी
रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

१० डिसेंबर २०१९ च्या साप्तहिक सायबर क्राईम मध्ये प्रकाशित.