बियाणं
निजलं मातीत
तान्हुलं बियाणं
बरसेन धोधो
उगावं जोमानं
काळ्या भू पडलं
पोटी गोड सपान
रान होईल हिरवं
पीकाच्या रूपानं
कुठे दोन पाती
ये ढेकुळ फोडून
विनवे विठोबाला
दोन हात जोडून
थोडासा शिरवा
जातो ढग पळून
एवढसं रोप ते
जाईन रे जळून
जगण्या धडपडे
गेलं भारानं वाकून
ओतलं मी सारं
ना हातचं राखून
भिजव रान सारं
नव्या तू दमानं
जीव सोडला काही
कोवळ्या कोंबानं
• रघुनाथ सोनटक्के, पुणे
मो. ८८०५७९१९०५