Friday, 28 February 2020

अवकाळी

अवकाळी
सांडून गेल्या बागा
गळून गेला फुलोर
नासवून गेला पीक
पाऊस तो मुजोर !

ओलाचिंब हरभरा,
गळला आंब्याचा मोहोर,
द्राक्ष-डाळींबाचा सडा
केला कहरच कहर ...

कांदा पुरता नासला,
टमाटी, भाजी सडली
रोजी-रोटीची चिंता
पुन्हा नव्यानं पडली

पिकलं होतं सुपानं
फाडला माझा पदर
कसं काढायचं वर्ष
कसं भरायचं उदर ?

नको तेव्हा बरसला
ऐन आल्यावर बहर
डोळ्यादेखत नासवलं
का प्यावं आता जहर ?

देत नाहीस रे तू जे
मी मागितलं मागणं
पटत नाही देवा तुझं
हे अवकाळी वागणं ...
• रघुनाथ सोनटक्के

२२ मार्च २०२०, दै. लोकशाही वार्ता
 २३ एप्रिल २०, दै. युतीचक्र, १ जून २०२० दै आदर्श महाराष्ट्र 
Raghunath Sontakke

Raghunath SontakkeRaghunath Sontakke








Thursday, 6 February 2020

लगन

तुय लगन पोरी
तुय लगन होईन पोरी
तवा जाशीन तू दूर
पण माह्या जीवात आग
अन् ईन डोयात पूर

तुया लगनात पोरी
नाचतीन पोरी-पोरं
मी मातरं एकटाच असीन
लळीन संग वारं

तुया लगनात पोरी
हास्तीन तुये होठ
मले मातरं प्या लागीन
तुया जुदाईचा घोठ

तुया हातावर्ची मेंदी
रंगुन जाईन फार
अन् उळवतीन लोकं
तुया लगनाचा बार

होईन तुयं सुभमंगल
अन् पळीन गयात हार
मी मातरं होईन पोरी
जागच्या जागी ठार

लळशीन तू जवा
सारं जग पाईन
कोनासाठी लळतं
कोनाले ना कईन

मी तुयावर पेरम करतो
फक्त ध्यानात ठेवजो
आठोन आली माही तं
तवा चंद्राकळे पायजो

या जन्मात नाई
तुयं मायं वं मीलन
पुळच्या जन्मी तं
तुया शीवाई ना जमन
• रघुनाथ सोनटक्के
   (प्रकाशित कविता)

२००१ दै. देशोन्नती मधे प्रकाशित