Thursday, 20 June 2019

पाण्याची बचत


« पाण्याची बचत »
जमिनीखालचं संपलं आता
पावसाचं साठवलं पाहिजे
इतिहासातल्या दुष्काळाला
आतातरी आठवलं पाहिजे

जरी असलं कुठे मुबलक
जपुन वापरा पाणी
पाण्यासाठी वणवण करताना
दिसु नये कुणी

'पाणी अडवा, पाणी जिरवा'
करू नका नुसती 'म्हण'
खोल जातंय दिवसेदिवस
जबाबदार अ‍ाहोत प्रत्येकजण

कार धुणे, नळ खुले
असा अपव्यय करणे टाळा
पाण्यासाठी होतात भांडणे
सोडवावीत किती वेळा

वृक्ष लागवड, जल-संवर्धन
हाच त्यावर उपाय आहे नामी
आज केलेली पाण्याची बचत
येईल पुढच्या पिढीच्या कामी
• रघुनाथ सोनटक्के

(प्रकाशित)

Tuesday, 18 June 2019

पावसा

« पावसा »

लवकर ये पावसा
वाट पाहून थकलो
उन्हातान्हाचं शेतात
लय हाय मी खपलो

ढेकळं फोडले म्या
फाळ केलं दोनदा
दमानं बरस गड्या
बरं पिकू दे अवंदा

सकाळी कोरं दिसते
दुपारी पडते ऊन
सांजला वाटते असं
का येतोस दणकून!

वादळ सुटते खुप
वारं झोंबते अंगाला
मृग चालला संपत
का झुलवतो आम्हाला

रातीबी झोपतो दारी
सारं मोकळंच दिसते
पांढरे ढगं म्हणजे
जणू थिगळंच भासते


झोळी केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुझे
येऊ दे थोडीबी कदर
• रघुनाथ सोनटक्के
 
१९ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी मधे प्रकाशित
२० जून २०१९ दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
जून २०१९ दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
२३ जून २०१९ दै. स्वतंत्र भारत, समर पुरवणीमधे प्रकाशित
 

« पावसा »
(वऱ्हाडीतून)

 येरे बावा लौकर
वाट पावुन थकलो
उनातानाचं वावरात
लय हाय मी खपलो

ढेकलं फोळ्ळे
वाही केली दोन्दा
दमानं बरस बावा
बरं पिकू दे
औंदा

सकाऊन कोरं दिस्ते
दुपारी पळ्ते ऊन
संद्याकाई वाट्टे असं
येसीन बा दणकून

धुंदाळ सुटते लय
वारं झोंबते आंगाले
मिरूगही चाल्ला सरत
काऊन झुलोतं आमाले

रातीबी झोपतो दारी
सारं मोकंयच दिस्ते
पांड्डे ढगं आंगळ्ताचे
मले थिगयच
वाट्टे

झोई केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुये
येऊ दे थोळी कदर

• रघुनाथ सोनटक्के

२३ जून २०१९ दै. मातृभूमीमधे प्रकाशित
३० जून २०१९, दै. तरुण भारत (नागपूर), आसमंत पुरवणीत प्रकाशित

 

Thursday, 13 June 2019

पहिला पाऊस




पहिला पाऊस

जीव कासाविस
शुष्क सारी भुई
सगळ्यांची होई
लाहीलाही

दाटला अंधार
सुसाटला वारा
आसमंत
धरा
 गंधाळली

टप टप थेंब
सरीवर सरी
तृप्त सृष्टी सारी
प्राणीमात्र

गर्द झाडेवेली
नटली अवनी
पक्षी गातो गाणी
रानोमाळी

रम्य चराचर
दृश्य मनोहर
हर्ष सभोवार
दाटलेला

• रघुनाथ सोनटक्के ‎


११ जून २०१९ दै. औरंगाबाद केसरी मधे प्रकाशित
१८ जून २०१९ च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित
१५ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित
१९ जून २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
२७ जून २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
साप्ताहिक झी मराठी दिशा, २१ जून २०१९ ला प्रकाशित
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5624415757003576617&title=pahila%20paus&SectionId=4805737089856539540&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE