Saturday 17 February 2018

अंतरिचे बोल


« अंतरिचे बोल »


घाव केले हृदयी
जखमाही केल्या खोल
कविता होऊन पडले
मनी अंतरिचे बोल
     न पुसता केले प्रेम
     सदा साठवले मनात
     वाहले अश्रू नयनातुन
     काय हेच त्याचे मोल
विसर पडला जगाचा
आठवणीतही तुझे राज्य
आधाराविणा ढळलो
सावरू कसा तोल
     प्राण माझा, स्वप्न माझी
     होते सारे तुझ्यासाठी
     मला हवे होते फक्त
     दोन प्रेमाचे बोल
येईल वर्षा कधीतरी
फुटेल पालवी फांदीवर
गाईल पुन्हा कोकिळ
वर्षागिताचे बोल
     कविता होऊन पडले
     मनी अंतरिचे बोल

• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे (पुणे)
  मो. 8805791905


दै देशोन्नती मधे प्रकाशित 

तुझ्यावर

तुझ्यावर

निसर्गानं ऋतुवर करावं
तसं प्रेम तुझ्यावर केलं

       माळ्यानं फुलावर
       पाखरानं पिलावर
       तसं प्रेम तुझ्यावर केलं
पक्षानं झाडावर
पानानं दवांवर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
        मातेनं गर्भावर
        जीवानं श्वासावर
        तसं प्रेम तुझ्यावर केलं
तटानं नदीवर
माशानं पाण्यावर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
       नभानं धरेवर
       सूर्यानं जगावर
       तसं प्रेम तुझ्यावर केलं
राघुनं मैनेवर
कान्ह्यानं राधेवर
तसं प्रेम तुझ्यावर केलं
      • रघुनाथ सोनटक्के
         तळेगाव दाभाडे (पुणे)
         मो. 8805791905
        
दै देशोन्नती मधे प्रकाशित
१५ सप्टेंबर २०१९ विदर्भ मतदारमधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 

Saturday 3 February 2018

जींदगीचा सत्यानास

« जींदगीचा सत्यानास »
जवा म्या घेतला हाती दारूचा गिलास
तवापासून राज्या मा संसार झाला खलास

गमावली राज्या म्या दारूत घरची नोटन्नोट
जवापासून घेत गेलो दारूचा मी घोटन्घोट

बायको न् पोरं माह्याकळे भिरभिर पाह्येत
मी ये लोग माह्यासाठी ते जेव्याचे राह्येत

बायेरून येवो मी लागुन झोकांड्या खात
बायकोले मारझोळीत जाये मायी सारी रात

बायको धावे कुत्र्यावाणी, मी पेवो दारूचं पानी
खरंचं या दारूपाई गेली वाया माह्यी जींदगानी

माया इस्टेटीचं निरामन केलं म्या पानी
मंग पायेत लेकरं तोंडाकळे भिकार्‍यावाणी

बायकोबी गेली तिच्या मायेरी पवून
अन् मी बस्लो हाती धुपारनं घेवून

जवापासून घेत्ला म्या हाती दारूचा प्याला
तवापासूनच माह्या जींदगीचा सत्यानास झाला

• रघुनाथ दा. सोनटक्के

   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905
(३ जून २००० दै. देशोन्नती)