Tuesday, 17 September 2019

माणुसपण

माणूसपण

भुकेल्या, तहानलेल्याला
अन्नपाणी देणार्‍या गाडगेबाबात
मला माणूसपण दिसलं

देश, ग्राम, शेतकर्‍यासाठी
गाणार्‍या तुकडोजीच्या,
खंजेरी बोलात
मला माणूसपण दिसलं

दलितांसाठी जगणार्‍या
रात्रदिन झटणार्‍या,
स्व जागवणार्‍या,
बाबांच्या लेखणीत
मला माणूसपण दिसलं

स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या
अहिंसेच्या 'हे राम' मधे
मला माणूसपण दिसलं

अज्ञानाच्या अंधारात
क्रांतीची ज्योत पेटवणार्‍या
सावित्री-ज्योतिबात
मला माणूसपण दिसलं
• रघुनाथ सोनटक्के

प्रकाशित

Wednesday, 4 September 2019

गुर्जी

 
• गुर्जी •
 

Raghunath Sontakke

पांड्डे कप्ळे घालत
साधे आम्चे गुर्जी
शिकोयाले फक्त खळू
होती तुट्की खुर्ची

भिंतीवर काया फळा
हातात फांदीची छळी
घाबरत जावो सग्ळे
पन वाटत जाये गोळी

शिकोयाले व्हते कळक
आतून लोण्याचा गोया
काळून आणत घरातून
राये परतेकावर डोया

मातीच्या गोयाले देला
संस्कारासंगं आकार
झ्याक शिकोलं गणित
वेलांटी, मात्रा, ऊकार

शिक्षणाचं पेरून बी
लावलं आमाले अत्तर
विचारलं कोन्ताई प्रश्न
तं हजर व्हतं उत्तर

पाजलं वागीनीचं दुद
उघळला तिसरा डोया
आठोनीत हायेत गुर्जी
जसा अत्तराचा फाया

• रघुनाथ सोनटक्के
(प्रकाशित)


१५ सप्टेंबर २०१९ तरुण भारत (नागपूर) आसमंतमधे प्रकाशित
८ सप्टेंबर २०१९ विदर्भ मतदारमधे प्रकाशित

Thursday, 29 August 2019

नाही विसरलो


• नाही विसरलो •
डोळ्यांनी अश्रू गाळणं सोडलं
बंद पापणीआड दु:ख आहे दडलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल घेलते ओठी तुझे नाव
मनी वसलेले फक्त तुझे गाव
हृदयावर नाव तुझं आहे गोंदलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल आणत जरी मोगर्‍याची फुलं
आठवतात तुझ्या कानातले ते डुलं
शांततेनं हृदयात वादळ आहे जपलं
अजून तुला नाही मी विसरलो

रात्रीला आठवतो बघून आकाशी
तुटतांना तारा तुला मागतो मनाशी
देवाला फक्त तेवढंच आहे मागलं
अजून तुला नाही मी विसरलो
• रघुनाथ सोनटक्के

दि. २९ ऑगस्ट २०१९ च्या दै. मराठवाडा संचारमधे प्रकाशित
३ सप्टेंबर २०१९ दै. स्वाभिमानी छावामधे प्रकाशित 

Saturday, 17 August 2019

तेव्हा

तेव्हा

जेव्हा सागराची लाट
किनार्‍याकडे धावणार नाही
फुललेल्या वसंतातही
कोकिळ गाणार नाही

मोराचे अश्रू
लांडोर पिणार नाही
सुर्याभोवती पृथ्वी
अन् पृथ्वीभोंवती
चंद्र फिरणार नाही

आकाशात इंद्रधनू
सप्तरंग भरणार नाही
धरेवर सकाळी
सुर्य उगवणार नाही

आकाशात शुक्र
अन् ध्रुव दिसणार नाही
तेव्हाच
तुझ्यावर प्रेम करणार नाही.

• रघुनाथ सोनटक्के
  कट्यार (अकोला)

दै. देशोन्नतीमधे प्रकाशित

तुला सोडून जाता जाता

  • जाता-जाता •

हसावी तू सदा
हिच माझी कामना
यावी प्रेमाने त्याच्या
शोभा तुझ्या जीवना

रहावी सुखी दिन-रात
हिच कामना आता
चाललो वळून न पाहता
तुला सोडून जाता जाता

खुलावे चैतन्य पानोपानी
हसत राहावं गुलाबासारखं
बहरावं तुझं जीवन
हिरव्या-हिरव्या झाडासारखं

पाहून डोळे मिटावे आता
तुला सोडून जाता जाता

जपलं तुला फुलासारखं
जवळ केलं काट्याला
यावी तुला सुखाची संगत
दु:ख माझ्या वाट्याला

पेटावे लाखो दीप
उजळाव्या कोटी वाता
वातीने पेटावी माझी चिता
तुला सोडून जाता जाता

• रघुनाथ सोनटक्के
  कट्यार (अकोला)

दै. देशोन्नती, अकोला, ९ एप्रिल २००२

Sunday, 28 July 2019

मोगरा



मोगरा

मऊ रेंगाळणार्‍या बटेला
तो मोगरा चिडवायचा
मागे वेणीला लावला तरी
गंध सुगंधी उडवायचा

तुझ्यासोबत असताना
त्याची मलाही साथ होती
त्या फुलणाच्या दिवसात
औरच त्याची बात होती

प्रेमाच्या बहारदार बागेत
वचने त्याने ऐकली आहेत
बसलो होतो ज्या झाडाखाली
त्याची पानेही आता सुकली आहेत

फुलं फुलतात नेहमीसारखी 
तो मोगराही फुलत असतो 
तुझ्याशिवाय आलोय म्हणून 
मला नेहमी बोलत असतो 

तुझ्या वाटेवर नजर आहे
परत मोगरा फुलेल का?
तुझ्या गालाची गुलाबी कळी
त्याला पाहून खुलेल का?

• रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

२८ जुलै २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
८ सप्टेंबर २०१९ आपला महाराष्ट्रमधे प्रकाशित
१५ सप्टेंबर २०१९ लोकशाही वार्तामधे प्रकाशित
 

Tuesday, 16 July 2019

पेरलं शिवार







पेरलं शिवार
उधारी बियाणं, पेरलं शिवारी
रिमझिम सरी, बरसती

काळ्या भूईनं, घेतलं कुशीत
येईल बियात
, जीव आता


उगवले कोंब, वारकरी सारे
दोन
हात करे, आभाळाला

दिसामासानं गा, वाढेल हा जीव
पावसा तू धाव, वेळोवेळी

कष्टतील हात, येईल उभारी
मिळेल भाकरी, सार्‍या जगा

पिकेल अवंदा, पीक मोत्यावाणी
गातील ती गाणी, पक्षीमात्र

येईल जोमात, सगळा शिवार
पीकही अपार,
देगा देवा
• रघुनाथ सोनटक्के

१६ जुलै २०१९ च्या दै. दिव्य-मराठी, मधुरिमा पुरवणीत प्रकाशित.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/246/16072019/0/8/
२८ जुलै २०१९ च्या स्वतंत्र भारत, समर पुरवणीमधे प्रकाशित
३० जूलै २०१९ दै. एकमत, साक्षी पुरवणीमधे प्रकाशित 
 १७ सप्टेंबर २०१९ च्या सायबर क्राईम अंकात प्रकाशित
Raghunath Sontakke