Sunday, 28 July 2019

मोगरा



मोगरा

मऊ रेंगाळणार्‍या बटेला
तो मोगरा चिडवायचा
मागे वेणीला लावला तरी
गंध सुगंधी उडवायचा

तुझ्यासोबत असताना
त्याची मलाही साथ होती
त्या फुलणाच्या दिवसात
औरच त्याची बात होती

प्रेमाच्या बहारदार बागेत
वचने त्याने ऐकली आहेत
बसलो होतो ज्या झाडाखाली
त्याची पानेही आता सुकली आहेत

फुलं फुलतात नेहमीसारखी 
तो मोगराही फुलत असतो 
तुझ्याशिवाय आलोय म्हणून 
मला नेहमी बोलत असतो 

तुझ्या वाटेवर नजर आहे
परत मोगरा फुलेल का?
तुझ्या गालाची गुलाबी कळी
त्याला पाहून खुलेल का?

• रघुनाथ सोनटक्के
   मो. ८८०५७९१९०५

२८ जुलै २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मधे प्रकाशित
८ सप्टेंबर २०१९ आपला महाराष्ट्रमधे प्रकाशित
१५ सप्टेंबर २०१९ लोकशाही वार्तामधे प्रकाशित
 

Tuesday, 16 July 2019

पेरलं शिवार







पेरलं शिवार
उधारी बियाणं, पेरलं शिवारी
रिमझिम सरी, बरसती

काळ्या भूईनं, घेतलं कुशीत
येईल बियात
, जीव आता


उगवले कोंब, वारकरी सारे
दोन
हात करे, आभाळाला

दिसामासानं गा, वाढेल हा जीव
पावसा तू धाव, वेळोवेळी

कष्टतील हात, येईल उभारी
मिळेल भाकरी, सार्‍या जगा

पिकेल अवंदा, पीक मोत्यावाणी
गातील ती गाणी, पक्षीमात्र

येईल जोमात, सगळा शिवार
पीकही अपार,
देगा देवा
• रघुनाथ सोनटक्के

१६ जुलै २०१९ च्या दै. दिव्य-मराठी, मधुरिमा पुरवणीत प्रकाशित.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/246/16072019/0/8/
२८ जुलै २०१९ च्या स्वतंत्र भारत, समर पुरवणीमधे प्रकाशित
३० जूलै २०१९ दै. एकमत, साक्षी पुरवणीमधे प्रकाशित 
 १७ सप्टेंबर २०१९ च्या सायबर क्राईम अंकात प्रकाशित
Raghunath Sontakke



Tuesday, 9 July 2019

वारी

« वारी »
संताचे भजन
ज्ञानदेव, तुका
लावुनिया बुक्का
भाळावर

नाम विठू मुखी
टाळांचा गजर
सात्विक प्रहर
चारी दिशा

कर कटेवरी
उभा विटेवरी
लागलीया आस
दर्शनाची

वैष्णवांना तुझी
अतीव गा ओढ
नाम तुझे गोड
सदा मुखी

चालली दिंडी
भक्तांचा मेळा
अगम्य सोहळा
सुखावह

• रघुनाथ सोनटक्के

६, ७, ८ जुलै २०१९ दै. विदभ मतदार, बंधूप्रेम, औरंगाबाद केसरी, लोकमंथन, समर पुरवणीत प्रकाशित
९ जुलै २०१९ च्या दै. दिव्य-मराठी, मधुरिमा पुरवणीत प्रकाशित



धरण

धरण

अश्रूंचा बांध
पाण्यात फुटला
जीवांचा गळा
पाण्याने घोटला

काळरात्र आली
लोंढ्याच्या गतीने
घटका मोजली
दिव्याच्या वातीने

झोपलीत बाळे
ती अंगाईविणा
मायेचाही आटला
अचानक पान्हा
 नव्हे तो बघे उठून
किती-किती वेळा

आज कसा लागला
बापाचा डोळा

लुटला संसार
वाहलीत भांडी
फुटलं धरण
गरिबीच्या तोंडी
• रघुनाथ सोनटक्के
९ जुलै २०१९ च्या दै. दिव्य-मराठी, मधुरिमा पुरवणीत प्रकाशित, १२ जुलै २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित
२१ जुलै २०१९ च्या दै. लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत, तरुण भारत (नागपूर), आसमंतपुरवणीत प्रकाशित
४ ऑगस्ट २०१९ च्या दै. विदर्भ मतदारमध्ये प्रकाशित.

Raghunath SontakkeRaghunath SontakkeRaghunath Sontakke


 

Thursday, 20 June 2019

पाण्याची बचत


« पाण्याची बचत »
जमिनीखालचं संपलं आता
पावसाचं साठवलं पाहिजे
इतिहासातल्या दुष्काळाला
आतातरी आठवलं पाहिजे

जरी असलं कुठे मुबलक
जपुन वापरा पाणी
पाण्यासाठी वणवण करताना
दिसु नये कुणी

'पाणी अडवा, पाणी जिरवा'
करू नका नुसती 'म्हण'
खोल जातंय दिवसेदिवस
जबाबदार अ‍ाहोत प्रत्येकजण

कार धुणे, नळ खुले
असा अपव्यय करणे टाळा
पाण्यासाठी होतात भांडणे
सोडवावीत किती वेळा

वृक्ष लागवड, जल-संवर्धन
हाच त्यावर उपाय आहे नामी
आज केलेली पाण्याची बचत
येईल पुढच्या पिढीच्या कामी
• रघुनाथ सोनटक्के

(प्रकाशित)

Tuesday, 18 June 2019

पावसा

« पावसा »

लवकर ये पावसा
वाट पाहून थकलो
उन्हातान्हाचं शेतात
लय हाय मी खपलो

ढेकळं फोडले म्या
फाळ केलं दोनदा
दमानं बरस गड्या
बरं पिकू दे अवंदा

सकाळी कोरं दिसते
दुपारी पडते ऊन
सांजला वाटते असं
का येतोस दणकून!

वादळ सुटते खुप
वारं झोंबते अंगाला
मृग चालला संपत
का झुलवतो आम्हाला

रातीबी झोपतो दारी
सारं मोकळंच दिसते
पांढरे ढगं म्हणजे
जणू थिगळंच भासते


झोळी केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुझे
येऊ दे थोडीबी कदर
• रघुनाथ सोनटक्के
 
१९ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी मधे प्रकाशित
२० जून २०१९ दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
जून २०१९ दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
२३ जून २०१९ दै. स्वतंत्र भारत, समर पुरवणीमधे प्रकाशित
 

« पावसा »
(वऱ्हाडीतून)

 येरे बावा लौकर
वाट पावुन थकलो
उनातानाचं वावरात
लय हाय मी खपलो

ढेकलं फोळ्ळे
वाही केली दोन्दा
दमानं बरस बावा
बरं पिकू दे
औंदा

सकाऊन कोरं दिस्ते
दुपारी पळ्ते ऊन
संद्याकाई वाट्टे असं
येसीन बा दणकून

धुंदाळ सुटते लय
वारं झोंबते आंगाले
मिरूगही चाल्ला सरत
काऊन झुलोतं आमाले

रातीबी झोपतो दारी
सारं मोकंयच दिस्ते
पांड्डे ढगं आंगळ्ताचे
मले थिगयच
वाट्टे

झोई केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुये
येऊ दे थोळी कदर

• रघुनाथ सोनटक्के

२३ जून २०१९ दै. मातृभूमीमधे प्रकाशित
३० जून २०१९, दै. तरुण भारत (नागपूर), आसमंत पुरवणीत प्रकाशित

 

Thursday, 13 June 2019

पहिला पाऊस




पहिला पाऊस

जीव कासाविस
शुष्क सारी भुई
सगळ्यांची होई
लाहीलाही

दाटला अंधार
सुसाटला वारा
आसमंत
धरा
 गंधाळली

टप टप थेंब
सरीवर सरी
तृप्त सृष्टी सारी
प्राणीमात्र

गर्द झाडेवेली
नटली अवनी
पक्षी गातो गाणी
रानोमाळी

रम्य चराचर
दृश्य मनोहर
हर्ष सभोवार
दाटलेला

• रघुनाथ सोनटक्के ‎


११ जून २०१९ दै. औरंगाबाद केसरी मधे प्रकाशित
१८ जून २०१९ च्या साप्ताहिक सायबर क्राईम मधे प्रकाशित
१५ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी छावा मधे प्रकाशित
१९ जून २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
२७ जून २०१९ च्या दै. मराठवाडा संचार मधे प्रकाशित 
साप्ताहिक झी मराठी दिशा, २१ जून २०१९ ला प्रकाशित
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5624415757003576617&title=pahila%20paus&SectionId=4805737089856539540&SectionName=%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE