Thursday 29 August 2019

नाही विसरलो


• नाही विसरलो •
डोळ्यांनी अश्रू गाळणं सोडलं
बंद पापणीआड दु:ख आहे दडलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल घेलते ओठी तुझे नाव
मनी वसलेले फक्त तुझे गाव
हृदयावर नाव तुझं आहे गोंदलं
अजून तुला नाही मी विसरलो

नसेल आणत जरी मोगर्‍याची फुलं
आठवतात तुझ्या कानातले ते डुलं
शांततेनं हृदयात वादळ आहे जपलं
अजून तुला नाही मी विसरलो

रात्रीला आठवतो बघून आकाशी
तुटतांना तारा तुला मागतो मनाशी
देवाला फक्त तेवढंच आहे मागलं
अजून तुला नाही मी विसरलो
• रघुनाथ सोनटक्के

दि. २९ ऑगस्ट २०१९ च्या दै. मराठवाडा संचारमधे प्रकाशित
३ सप्टेंबर २०१९ दै. स्वाभिमानी छावामधे प्रकाशित 

Saturday 17 August 2019

तेव्हा

तेव्हा

जेव्हा सागराची लाट
किनार्‍याकडे धावणार नाही
फुललेल्या वसंतातही
कोकिळ गाणार नाही

मोराचे अश्रू
लांडोर पिणार नाही
सुर्याभोवती पृथ्वी
अन् पृथ्वीभोंवती
चंद्र फिरणार नाही

आकाशात इंद्रधनू
सप्तरंग भरणार नाही
धरेवर सकाळी
सुर्य उगवणार नाही

आकाशात शुक्र
अन् ध्रुव दिसणार नाही
तेव्हाच
तुझ्यावर प्रेम करणार नाही.

• रघुनाथ सोनटक्के
  कट्यार (अकोला)

दै. देशोन्नतीमधे प्रकाशित

तुला सोडून जाता जाता

  • जाता-जाता •

हसावी तू सदा
हिच माझी कामना
यावी प्रेमाने त्याच्या
शोभा तुझ्या जीवना

रहावी सुखी दिन-रात
हिच कामना आता
चाललो वळून न पाहता
तुला सोडून जाता जाता

खुलावे चैतन्य पानोपानी
हसत राहावं गुलाबासारखं
बहरावं तुझं जीवन
हिरव्या-हिरव्या झाडासारखं

पाहून डोळे मिटावे आता
तुला सोडून जाता जाता

जपलं तुला फुलासारखं
जवळ केलं काट्याला
यावी तुला सुखाची संगत
दु:ख माझ्या वाट्याला

पेटावे लाखो दीप
उजळाव्या कोटी वाता
वातीने पेटावी माझी चिता
तुला सोडून जाता जाता

• रघुनाथ सोनटक्के
  कट्यार (अकोला)

दै. देशोन्नती, अकोला, ९ एप्रिल २००२