Showing posts with label ShabdRasik. Show all posts
Showing posts with label ShabdRasik. Show all posts

Monday, 23 December 2019

भातकं

भातकं
आबा माह्या आने
भातक्याची पुळी
गुया परीस  राये
लय त्याची गोळी

शेव-चिवळा, जलेबी
कुरकुर थे पापळी
सारे बसत लेकरं अन्
गोल करत साकळी

आजच्या पिज्ज्याले नाई
त्या भातक्याची गोळी
चुलीच्या सैपाकाची सर
गैसवरच्याले थोळी?

कदी भेटे उसाचं कांडं
कधी गुयाची भेली
धावपईच्या जगात थे
मजाच गायब झाली

जीव लावणारे मान्सं
देत चारान्याचं भातकं
लाहनपनी वाटे त्याचं
सुख अभायाइतकं
• रघुनाथ सोनटक्के


२२ डिसेंबर २०१९ च्या दै. विदर्भ मतदार मध्ये प्रकाशित.  
२३ फेब्रुवारी २०२० च्या दै. मातृभूमी (अकोला) मधे प्रकाशित
३१ मे २०२० च्या दै. युतीचक्र


Raghunath Sontakke
Raghunath Sontakke

Monday, 2 December 2019

दिवाळी


दिवाळीचा उत्सव

प्रकाशाचा उत्सव दिवाळी 
सगळ्यानांच दिसावा 
उपेक्षित कुणी या जगी 
उपाशी ना निजावा 

मनामनात पेटाव्यात 
दया आणि  शांतीच्या ज्योती 
विजय करू अंधःकारावर
पेटवूया ज्ञानाच्या वाती 

दंभाला द्यावे पेटवून 
चेतवून द्यावे विकाराला 
सत्याचा जळो दीप 
दूर लोटून अन्यायाला 


 • रघुनाथ सोनटक्के (पुणे)
      मो. ८८०५७९१९०५

२७ ऑक्टोबर २०१९ च्या दै विदर्भ मतदारमधे प्रकाशित

वाटते

वाटते 

नागमोडी वाट
कौलारू ती घरे
ओढ वाटते

नदीकाठी मंदीर
आणि गावजत्रा
रोड वाटते

रानातला वारा
पावसाची सर
गोड वाटते

गावकरी मुद्रा
आता ती ओळख
गाढ वाटते

आठवण झोके
प्रेमातील धोके
मोद वाटते

जुनीच ती खाट
अथांग अभाय
शोध वाटते

मतलबी जन
धावे सारे जग
खेद वाटते

• रघुनाथ सोनटक्के
  मो. ८८०५७९१९०५

३ नोव्हेंबर २०१९ च्या दै तरुण भारत, आसमंत पुरवणीत प्रकाशित
१२ जानेवारी २०२० च्या दै विदर्भ मतदार मधे प्रकाशित
Raghunath Sontakke
 

सीतादई

सीतादई
बहरलं हिर्व रान
आली पर्‍हाटी फुलून
दह्यावानी पांड्डापट
निंगे कापुस ऊलून

टोचे बोटाले कच्कन
त्याची धारदार नखं
बाई खंदाळी येचता 
गेले दुखून वं बखं

तपे सुर्य अभायात
झाल्या बोंडाच्या चांदन्या 
संध्याकाई ईन बंडी
भरले गठोळे बांधन्या 

वाजे कसांड्या पांदीनं
आला घ्याले घरधनी
भरल्या खंदाळ्या पाऊन
जीव गेला हरकुनी

हात लावा वं सयाव्हा 
घेते पान्याचं भरनं
बरबटी शेंगा-भेंडं
जमा केले त्यात वरनं

चार गाठोळे बसले
ऐकमेकाले खेटून
गादी कर्‍याले जरासा
औंदा ठेवतो राखून

किस्न निजे पायन्यात 
ऊतू गेलं लाह्या-दही
देवा! पिकू दे असंच 
आता झाली सीतादई
रघुनाथ सोनटक्के
२४ नोव्हेंबर २०१९ च्या दै मातृभूमी (अकोला) आणि विदर्भ मतदार (अमरावती) मधे प्रकाशित
३ डिसेंबर २०१९ च्या सायबर क्राईम मध्ये प्रकाशित.
७ जाने. २०२० च्या साप्ताहिक कृषकोन्नती मधे प्रकाशित.
Raghunath Sontakke





Tuesday, 18 June 2019

पावसा

« पावसा »

लवकर ये पावसा
वाट पाहून थकलो
उन्हातान्हाचं शेतात
लय हाय मी खपलो

ढेकळं फोडले म्या
फाळ केलं दोनदा
दमानं बरस गड्या
बरं पिकू दे अवंदा

सकाळी कोरं दिसते
दुपारी पडते ऊन
सांजला वाटते असं
का येतोस दणकून!

वादळ सुटते खुप
वारं झोंबते अंगाला
मृग चालला संपत
का झुलवतो आम्हाला

रातीबी झोपतो दारी
सारं मोकळंच दिसते
पांढरे ढगं म्हणजे
जणू थिगळंच भासते


झोळी केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुझे
येऊ दे थोडीबी कदर
• रघुनाथ सोनटक्के
 
१९ जून २०१९ च्या दै. स्वाभिमानी मधे प्रकाशित
२० जून २०१९ दै. वाचकमंच मधे प्रकाशित  
जून २०१९ दै. बलशाली भारत मधे प्रकाशित 
२३ जून २०१९ दै. स्वतंत्र भारत, समर पुरवणीमधे प्रकाशित
 

« पावसा »
(वऱ्हाडीतून)

 येरे बावा लौकर
वाट पावुन थकलो
उनातानाचं वावरात
लय हाय मी खपलो

ढेकलं फोळ्ळे
वाही केली दोन्दा
दमानं बरस बावा
बरं पिकू दे
औंदा

सकाऊन कोरं दिस्ते
दुपारी पळ्ते ऊन
संद्याकाई वाट्टे असं
येसीन बा दणकून

धुंदाळ सुटते लय
वारं झोंबते आंगाले
मिरूगही चाल्ला सरत
काऊन झुलोतं आमाले

रातीबी झोपतो दारी
सारं मोकंयच दिस्ते
पांड्डे ढगं आंगळ्ताचे
मले थिगयच
वाट्टे

झोई केली म्या
पसरते लक्क्षुमी पदर
आ वासून पिल्लं तुये
येऊ दे थोळी कदर

• रघुनाथ सोनटक्के

२३ जून २०१९ दै. मातृभूमीमधे प्रकाशित
३० जून २०१९, दै. तरुण भारत (नागपूर), आसमंत पुरवणीत प्रकाशित

 

Tuesday, 27 November 2018

मातेरं


« मातेरं »

दुष्काळाचा शाप
लागे माह्या मांगं
वावरात पिकाचा
ना कसलाच थांगं

फेडू कसं मग
सावकाराचं रिनं
पदरी पडे फकस्त
पैकाच तिनं

पोेरांचं शिक्षाण
सुटलंया मदी
कशी तगेल हीर
जर आटलीच नदी

न्हाती धूती पोर
म्हणं करू लगनं
तुरीला फुलू देगा
केलीया राखणं 

कापसाचं फुललं
उधारीत बोंड
लपून चाले लक्षुमी
पदरात तोंड

कापडं शिवू म्हणं
फाटलं धोतरं
शेतीमधे मरून
झालंया मातेरं

- रघुनाथ सोनटक्के 
तळेगाव, पुणे 8805791905


 दै.  पथदर्शी  २६ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित कविता
दै.  विदर्भ मतदार २५ नोव्हेंबर व ९ डिसेंबर २०१८ ला प्रकाशित
झी मराठी दिशा साप्ताहिकात प्रकाशित माझी कविता
(३ फेब्रुवारी २०१९ च्या दै. लोकशाही वार्ता मधे प्रकाशित)
१६ मे २०१९ च्या दै. वाचकमंच मधे प्रकाशित
३१ मे २०१९ च्या दै. बंधुप्रेम मधे प्रकाशित 
९ जून २०१९ च्या स्वतंत्र भारत, समर पुरवणीत प्रकाशित
१८ जून २०१९ च्या दै. एकमत साक्षी पुरवणीमधे प्रकाशित 
३ मार्च २०२० च्या साप्ताहिक कृषकोन्नती मधे प्रकाशित


Raghunath SontakkeRaghunath SontakkeRaghunath SontakkeRaghunath Sontakke 
Raghunath Sontakke



Monday, 1 October 2018

अवयवदान

« अवयवदान »

अवयवदान । करूया सारे
मरून उरा रे । जगती या ।।

पाप-पुण्याचा । कशा लेखाजोखा ।
दुर करा धोका । गरजुचा ।।

मरावे परी या । जगती उरावे
दान करावे । देह आपले ।।

रूढी-समजुतींना । देवुनी फाटे ।
दान करा मोठे । अवयवांचे ।।

अंधाला दृष्टी द्या । कुणाला हृदय
ब्रेनडेड होता । दान करा ।।

काळीज आपलं । देवून थोडं ।।
करा जीव गोड । आजार्‍याचा ।।

किडनी न् डोळे। आहेत दोन
वाचतील प्राण । एक देता ।।

त्वचा, आतडे । करा रक्तदान
वाचवा प्राण । वंचितांचे ।।
रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे
  मो. 8805791905

९ ऑक्टोबर २०१८ च्या सायबर क्राईम मध्ये प्रकाशित 


  

Saturday, 25 August 2018

भाऊराया



« भाऊराया »


Calligraphy by Raghunath Sontakke


माझ्या भावाचा ना महल
आहे छोटसं मायाळू घर
सुखाचा संसार त्याचा
नाही त्याला कशाची सर

भाऊबीजेला येतो घरी
वाट पाहते टक लावूनी
साठविते रूप त्याचं
माझ्या या गं लोचनी

राखी बांधाया हात त्याचा
मिळू दे मला जन्मोजन्मी 
पहाडासारखा उभा पाठी
मला नाही कशाची गं कमी

रक्षण करील तो माझं
नाही त्याला कशाची पर्वा
आयुष्य लाभु दे उदंड 
माझा जीव आहे त्यात सर्वा

आम्हा दोघामधे आहे
राखीचा हा प्रितीबंध
नातं राहू दे देवा आमचं
जन्मोजन्मी एकसंध


•  रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

६ नोव्हेंबर २०१८ देशोन्नती नागपूर दिवाळी विशेषांकात प्रकाशित 
दै. कार्यारंभ (बीड) मधे २३ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 
साप्ताहिक सायबर क्राईम मधे २७ नोव्हेंबर २०१८ ला प्रकाशित 


  


Thursday, 16 August 2018

तो पाऊस

« तो पाऊस »

पाऊस आला की
तु खुप भिजायचीस
माझ्या उबदार कुशीत 
गुपचुप निजायचीस

तुला आठवत असेल
आपलं पावसात भिजनं
बिलगन्या मिठीमधे
तुझं खोटंखोटं लाजनं

म्हटलो होतो तुला सखे 
तु दूर नको जाऊस
आळवीत होता तुला
तो बरसणारा पाऊस

तु होतीस अन् मी होतो
त्या शेताच्या बांधावर
धाय मोकलून रडली होतीस
पावसात माझ्या खांद्यावर

साक्षी आहे आपल्या प्रेमाला 
ते बांधावरलं हिरवं झाड
श्रावणातल्या सरीसवे सखे
ती आठवण तरी काढ

तु येशील भिजायला म्हणुन
रोज पाऊस बरसतो
पाहण्या माझ्या मिठीमधे तुला
ढगाढगातुन गरजतो

• रघुनाथ सोनटक्के
  तळेगाव दाभाडे, पुणे 
  मो. ८८०५७९१९०५

२९ऑगस्ट २०१८च्या दै. नवाकाळ मधे प्रकाशित 
१५ ऑगस्ट २०१८च्या सायबर क्राईम (औरंगाबाद) मधे प्रकाशित
६ ऑक्टोबर च्या दै. लोकशाही वार्ता २०१८ मधे प्रकाशित
३० जून २०१९, दै. गाववाला  आणि मराठवाडा संचार मधे प्रकाशित
३० जून २०१९, दै. मातृभूमी (अकोला)  
३० जून २०१९, दै. वाचकमंच मधे प्रकाशित
३० जून २०१९ दै. स्वतंत्र भारत, समर पुरवणीत प्रकाशित
२ जुलै २०१९ दै. दिव्य-मराठी, मधुरिमा पुरवणीत प्रकाशित
१९ ऑगस्ट २०१९ दै. सकाळ, अकोला मधे प्रकाशित  

                  Raghunath Sontakke 


भिजलेला तुझा तो पदर
होता बेभान ओला पाऊस
रूप तुझं घायाळ करे मला
म्हणायचो नको काही लेवुस

गार गार वारा असायचा
यायची भेटायला सारं सोडून
जळतंय माझं मन सखे
आता आठवणी त्या काढून

Sunday, 5 August 2018

मैत्री

« मैत्री »

मैत्री असावी कृष्ण-सुदाम्याची
तमा नसावी कसल्याच भेदाची

मित्र असावा धावून येणारा
सुख-दुःखात साथ देणारा

कौतुकाची थाप आणि हिमंत देणारा
चूकही मोठ्या मनाने माफ करणारा

मैत्री ही विश्वासाची श्वास असावी
दूर राहून भेटण्याची आस असावी

मैत्री म्हणजे असावं अतुट बंधन
दोन मनाचा आहे हा पवित्र संगम

• रघुनाथ सोनटक्के
   तळेगाव दाभाडे, पुणे
   मो. 8805791905

३० ऑक्टोबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित 


Thursday, 19 July 2018

परत ये सखे

« परत ये सखे »

ना जाऊस दूर । मला सखे दुर ।
आसवांचा पुर । आवरेना ।।

जगु कसा मी गं । सांग तुझ्याविणा ।
छळतात सदा । आठवणी ।।

हर श्वास घेतो । सदा तुझे नाव ।
सापडेना गाव । माझे मला ।।

श्वास तु माझा । तडफडे जीव ।
झाला कासाविस । तुझ्यासाठी ।।

सहन ना होत । हा विरह तुझा ।
आसावला जीव । भेटावया ।।

परत ये आता । हाक देतो जीव ।
ओठी तुझे नाव । क्षणोक्षणी ।।

रडतो तुझ्यासाठी । जीव माझा भोळा ।
झालो मी वेडा । तुझ्यापायी ।।

  • रघुनाथ सोनटक्के
    मो. 8805791905

२० जुलै २०१८ च्या दैनिक डहाणू मधे प्रकाशित 


Wednesday, 11 July 2018

उघाड

« उघाड »


Calligraphy by Raghunath Sontakke

अशी देली रं उघाड
पिकांनी टाकली मान
हुलकावणी दिली गड्या
कंठाशी आलाय प्राण

होतं नोतं टाकलं मातीत
जीव ओतला सारा
कष्टाचं होऊ दे सोनं
रानी गुंजतो फकस्त वारा

पिढी खपली रानात
दान पडू दे रं पदरी
पोटाला अन ल्याला काप्डं
मुक्याला मिळंल बाजरी

वार्‍यासंग ढगबी पळती
रातीला पडतं चांदणं
फाटक्या झोळीला भरू दे
हाय एवढंच आम्चं मागणं

उन्हातान्हांत खपुन झालं
अन् तुजं अस्मानी वागणं
भुईसंग आसावला जीव
अन् मेघा तुजी वाट बघणं!

अन् मेघा तुजी वाट बघणं!


• रघुनाथ सोनटक्के

   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905

१९ ऑगस्ट २०१८ च्या दै. लोकशाही वार्ता, प्रतिबिंब पुरवणीत प्रकाशित
२२ जुलै २०१८ च्या दै. तरुण भारत मधे प्रकाशित 
१२ जुलै २०१८ दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित 
 १५ जुलै २०१८ च्या दै. विदभ मतदार मधे प्रकाशित
१५ जुलै २०१८ सा. कल्याण टाईम्स मधे प्रकाशित

                                Vidarbha Matadar - Raghunath Sontakke
Kalyan Times - Raghunath Sontakke