Showing posts with label Shabd. Show all posts
Showing posts with label Shabd. Show all posts

Saturday, 3 February 2018

जींदगीचा सत्यानास

« जींदगीचा सत्यानास »
जवा म्या घेतला हाती दारूचा गिलास
तवापासून राज्या मा संसार झाला खलास

गमावली राज्या म्या दारूत घरची नोटन्नोट
जवापासून घेत गेलो दारूचा मी घोटन्घोट

बायको न् पोरं माह्याकळे भिरभिर पाह्येत
मी ये लोग माह्यासाठी ते जेव्याचे राह्येत

बायेरून येवो मी लागुन झोकांड्या खात
बायकोले मारझोळीत जाये मायी सारी रात

बायको धावे कुत्र्यावाणी, मी पेवो दारूचं पानी
खरंचं या दारूपाई गेली वाया माह्यी जींदगानी

माया इस्टेटीचं निरामन केलं म्या पानी
मंग पायेत लेकरं तोंडाकळे भिकार्‍यावाणी

बायकोबी गेली तिच्या मायेरी पवून
अन् मी बस्लो हाती धुपारनं घेवून

जवापासून घेत्ला म्या हाती दारूचा प्याला
तवापासूनच माह्या जींदगीचा सत्यानास झाला

• रघुनाथ दा. सोनटक्के

   तळेगाव दाभाडे, पुणे

   मो. 8805791905
(३ जून २००० दै. देशोन्नती)

Monday, 22 January 2018

शब्द

 « शब्द »
Shabda-Raghunath Sontakke

शब्द तोडतात क्षणात मनामनातील नाती
शब्दच होतात कधी शिपंल्यातील मोती

धन, देह नश्वर, शब्दच उरतात अंती
वाफ होऊन तरंगत राहते बाकी आसमंती

शब्दच पसरवतात हिंसा, भेद, मत्सर विखारी
कुणी शब्दांचा रसिक, तर कुणी असतो भिकारी

कुणी करावा जप शब्दांचा, कुणी कराव्या ढाली
कुणी व्हावा अंगार, तर कुणी कराव्यात मशाली

शब्दानेच होतो ‘वाल्मिकी,  कुणी होतो मवाली
शब्दच होतात गोड, बाकी सारं त्याच्या हवाली

शब्द कायदा, शब्द वायदा, कुणाचा असतो कव्वाली
त्यानेच होते शिक्षा, समाधान, अन् भावाची वसुली

         • रघुनाथ सोनटक्के, मो. 8805791905

१ नोव्हेंबर २०१८ च्या दै. पथदर्शी मधे प्रकाशित  
२ डिसेंबर २०१८ च्या दै. डहाणू मित्र मधे प्रकाशित